गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी राबविण्यात येत आहे. हे अभियान राबविण्यात राज्यात गोंदिया जिल्हा आजघडीला अव्वलस्थानी आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळांमध्ये भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. ही योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळेत राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १६५९ शाळांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यातील ११५९ शाळा अभियानात सहभागी झाल्या असून ४२६ शाळांत अभियान पूर्णपणे राबविण्यात आले आहे. तर उर्वरित ७४ शाळा लवकरच अभियानाची अंमलबजावणी करणार आहेत.
हेही वाचा : ‘नासुप्र’तील दस्तावेज चोरून प्लाॅट विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ आरोपींना अटक, काही अधिकारीही रडारवर
उल्लेखनीय म्हणजे, अभियान राबविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे. त्याखालोखाल धुळे, हिगोली जिल्हा आहे. आदिवासीबाहुल्य, नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात असल्याने भविष्यात याचा लाभ जिल्ह्यातील शाळा, पर्यायाने विद्यार्थ्यांना मिळणार अशा आशावाद गोंदियाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केला आहे.