गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट व ईव्हीएमची नव्याने मतमोजणी करावी यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी निवडणूक प्रशासनाकडे १ लाख ८९ हजार रुपयांचे शुल्क जमा केले आहे. येत्या ४५ दिवसांत व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल हे ६१ हजार ४६४ मतांनी निवडून आले. गोंदिया विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते; पण थेट लढत ही भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यातच होती, तर हे दोन्ही उमेदवार सलग तिसऱ्यांदा समोरासमोर होते. गेली निवडणूक गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या चिन्हावर लढविली होती, तर विनोद अग्रवाल यांनी अपक्ष लढविली होती. तेव्हा २८ हजार मतांनी विनोद अग्रवाल विजयी झाले होते. या विधानसभा निवडणुकीत गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.
हेही वाचा – इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…
पक्षाने त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, तर अपक्ष निवडून आलेले आ. विनोद अग्रवाल हेसुद्धा भाजपमध्ये परतले. त्यांनी ही निवडणूक कमळ चिन्हावर लढवीत ६१ हजार मतांनी विजयी झाले. गोंदिया विधानसभा मतदारसंघात प्रथमच कमळ फुलवीत इतिहास स्थापन केला. या निवडणुकीत अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असाच सामना रंगला होता. भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल ६१ हजार मतांनी विजयी झाले. त्यामुळे काँग्रेस उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी या मतदारसंघातील चार मतदान केंद्रांवरील मतमोजणीवर शंका उपस्थित करीत आक्षेप घेतला. त्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे १ लाख ८९ हजार रुपयांचे शुल्क भरून चार मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट पुनर्मोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आता ४५ दिवसांत या चार मतदान केंद्रांवरील मतमोजणी केली जाणार आहे.