गोंदिया : राज्याच्या टोकावरचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यात भंडारा, गडचिरोली, आदी जिल्ह्यांसह गोंदिया जिल्हाही झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून गणला जातो. शेतीचा हंगाम संपला की, दिवाळी सणापासून झाडीपट्टीत मंडई उत्सवाची सुरुवात होते. त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीचा पाडवा झाला की मंडईनिमित्त गावागावात मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल बघावयास मिळते. यानिमित्त झाडीपट्टीतील कलावंताना आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळत असून पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी दिवसा व रात्रीसुध्दा मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता गावा-गावात मंडईचे आयोजन होणार असताना झाडीपट्टीच्या नाटकाचे पडदे उघडणार आहेत. विशेष म्हणजे, या मंडई- मेल्यातून झाडीपट्टीच्या कलासंस्कृतीची जोपासना केली जात असून आता युवावर्गही यात पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. झाडीपट्टी ही कलावंताची खाण आहे. या खाणीत अनेक कलावंत निपजत आहेत. त्यामुळेच झाडीपट्टीतील संस्कृतीचे दर्शन कलावंताच्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम केले जाते. मंडई उत्सवानिमित्त प्रत्येक गावात दंडार, नाटक, लावणी, खडीगम्मत अशा कार्यक्रमांचे आयोजनसुध्दा केले जातात.

हेही वाचा : यंदा छोट्या विक्रेत्यांचीही दिवाळी जोरात, काय आहेत कारणे?

या माध्यमातून अनेक कलावंत पुढे येत असतात व मंचाच्या माध्यमातून आपली कलाकृती सादर करून लौकीक मिळवित असतात. विशेषतः याच माध्यमातून काही कलावंतांना हिंदी, मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या कलेतून झाडीपट्टीचा मान वाढविण्याचे एक चांगले कार्य घडून येत आहे. दिवसा मनोरंजनात्मक कार्यक्रम तर रात्रीच्या वेळीसुध्दा गावातील हौसी मंडळ, युवक मंडळाच्या वतीने नाटक, कव्वाली आदींचे आयोजन केले जाते.

हेही वाचा : वाहनचोरीविरोधी पथक सुस्त, उपराजधानीत वाहन चोऱ्या वाढल्या

तरुणाईसाठी आकर्षण

नाटकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनावर सुध्दा अधिक भर दिला जातो. मंडई उत्सव तरुणांसाठी अलीकडे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू लागले आहे. तरुणांची सर्वाधिक गर्दी मंडई उत्सवाच्या निमित्ताने दिसून येते. वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी, मजुरांचेसुध्दा मंडईतून मनोरंजन घडून येत असून काही वेळासाठी त्यांना विरंगुळा मिळत असतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia drama artists mandai utsav will start soon sar 75 css
Show comments