गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात बबई या गावी लग्न सोहळ्यातील जेवणातून लग्नातील सुमारे ६० पाहुण्यांना विषबाधा झाली. त्यांना गोरेगाव ग्रामीण रुग्णालय, चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया या सोबतच गोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की गोरेगाव तालुक्यातील बबई रहिवासी केशवराव भोजलाल बिसेन यांच्या धाकट्या मुलाचा लग्न सोहळा शुक्रवार ४ एप्रिल २०२५ रोजी आमगाव तालुक्यातील वळद या गावी झाला. लग्नसमारंभ आटोपल्या नंतर वरात शनिवार ५ एप्रिल ला दुपारी वराच्या घरी बबई येथे आली. दुपारच्या सुमारासच वरातीतील आणि घरच्या मंडळी करिता जेवण तयार करण्यात आले. त्या जेवणात वापरण्यात आलेले तांदूळ हे तीन वर्ष जुने होते तसेच टिनाच्या एका गंज चढलेल्या डब्यात ठेवलेले होते. या तांदळाचा वापर जेवणात करण्यात आलेला होता.
हे जेवण उपस्थित पाहुण्यांनी दुपारच्या सुमारास केले. त्यांना जेवण केल्यानंतर दोन-तीन तासाने सायंकाळच्या सुमारास उलट्या जुलाब आणि अतिसारचा त्रास जाणू लागला असता शनिवारी सायंकाळी ७:३० वाजता पासून जवळील गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करिता आणण्यास सुरुवात झाली. तर काही रुग्णांना त्रास जाणू लागल्यानंतर बबई गावा जवळील चोपा प्राथमिक केंद्र येथे दाखल करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास यापैकी पाच ते सहा रुग्णांना अधिकचा त्रास जाणू लागला असता त्यांची प्रकृती अत्याधिक अत्यव्यस्थ होत असल्याचे बघून गोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे . अशा ५ रुग्णांवर गोंदिया येथील के. टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
काही रुग्ण गोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या संदर्भात गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्णांनी सांगितले की जेवणात तयार करण्यात आलेला भात हा काहीसा लालसर रंगाचा होता आणि ते जेवण केल्यानंतरच त्यांना उलट्या जुलाब आणि अतिसार चा त्रास जाणवू लागला. एकापाठोपाठ एक अशा सर्व जेवण केलेल्यांना हा त्रास जाणवू लागला असल्याने सर्व रुग्णांना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल असलेल्या बहुतांश रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले.
शनिवार सायंकाळ ७:३० वाजता पासून गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात विषबाधा झालेले रुग्ण येण्यास सुरुवात झाली. गोंदिया ग्रामीण येथे उपचार घेत असलेले २८ रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे .
-डॉ. पी.के. पटले, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, गोरेगाव