गोंदिया : जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. आज पहाटे शहरालगतच्या एका नाल्याला पूर आल्यामुळे लगतची एक दुमजली इमारत नाल्यात कोसळली. यामुळे मायलेकाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफुटीसदृश्य पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहराजवळील फुलचूर नाल्याला पूर आला. नाल्यातील पाणी वाढळ्याने लगतच असलेली दोन मजली इमारत थेट नाल्यात कोसळली. यामुळे पाण्यात वाहून गेल्याने आईचा, तर घराच्या ढिगा-याखाली दबल्याने मुलाचा मृत्यू झाला. दिपिन अग्रवाल (२७) व किरण अग्रवाल (५०), अशी मृतांची नावे आहेत, तर अनिल अग्रवाल (५२) हे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. घराच्या ढिगा-याखालून दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या किरण अग्रवाल यांचा मृतदेह प्रशासनाच्यावतीने राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत आढळून आला. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
वाघ नदीत डिझेल टँकर गेला वाहून
गोंदिया जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मात्र, त्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे वाघ नदीला पूर आला असून ही नदी दुथडी भरून वाहात आहे. याच नदीत एक डिझेल टँकर वाहून गेल्याची घटना आज सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. देवरी तालुक्यातील वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे वाघ नदीला पूर आला आहे. असे असतानाही एका चालकाने आपला टँकर नदीपात्रातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे टँकर वाहून गेला.
हे ही वाचा…गोंदिया : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशापूर्वीच…
हे ही वाचा…अकोल्यातील श्री बाराभाई गणपतीची १३४ हून अधिक वर्षांची परंपरा
नागरिकांच्या घरांत शिरले पाणी
गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. शहरातील सखोल भागात पावसाचे पाणी साचून ते घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. घरांत शिरलेल्या पाण्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाने लवकरात लवकर घरांत शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांचा गोंदिया शहराशी संपर्क तुटलेला आहे