गोंदिया : महाराष्ट्रातील ‘धानाचे कोठार’ म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धानासह मका, हरभऱ्याकडे कल दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस सुरूच राहिल्याने रब्बी पेरणी लांबणीवर पडली होती. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार २८७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारी ३१५.६० हजार हेक्टरवर, तर हरभऱ्याचा पेरा ३३९७ हजार हेक्टरवर झाला आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ५७ आहे. यंदा चांगला पाऊस पडल्याने जिल्हयातील जलाशयांमध्ये पुरेसा असलेला पाणीसाठा, परतीच्या पावसामुळे जमिनीत निर्माण झालेली आर्द्रता, यामुळे यंदा रब्बी हंगाम जोमात राहील, असे चित्र दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ९४० हेक्टर आहे. यंदा ९ डिसेंबर पर्यंत गोंदिया तालुक्यात १४ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. तथापि, हरभरा आणि मका पिकावरच शेतकऱ्यांचा अधिक भर आहे.
रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून करडई, सूर्यफूल, तीळ अशा पिकांची शेतकरी पेरणी करीत असे. मात्र आता करडई, जवस, तीळ, सूर्यफूल या गळीत पिकांचे मात्र शेतकरी अल्प प्रमाणात पेरणी करीत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत असून, तेलवर्गीय पिकांची पेरणी इतिहासजमा होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काही पिकांवर रोगराई आणि किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हेही वाचा…यवतमाळ हिट अँड रन प्रकरण, कारने भाजी विक्रेते व दुचाकीस्वारांना उडविले
करडई, तीळ अन् जवस पिकाकडे दुर्लक्ष
यंदा तेलबियांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत सूर्यफूल ०० हेक्टर, जवस ६९० हेक्टर, करडई ३२ हेक्टर, मोहरी ८९० हेक्टर पेरा झाला असून, अवघ्या ६ हेक्टरवर तिळाचा पेरा झाला आहे. तेलवर्गीय पिकांतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी याकडे पुरता कानाडोळा केला आहे. काही शेतकरी तर स्वतःच्या कुटुंब उपयोगापुरतेच करडई, तीळ, भुईमूग ही पिके घेतात खरे मात्र, याचे प्रमाण अतिशय कमी आहे.
यंदाचा पाऊस रब्बीसाठी पूरक
सध्या रब्बी हंगामाला शेतात पाणी देण्यासाठी प्रकल्प, नदी, नाले, विहिरी, शेततळे तुडूंब आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम उत्तमच असणार, मात्र वीजपुरवठा दिवसा राहत नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. फक्त ७२ हेक्टरवर ऊस यंदा पाऊस चांगला झाल्याने नदी, नाले, विहिरी तुडूंब भरलेले आहेत. समाधानकारक पावसामुळे सिंचनाच्याही सोयी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, असे असूनही फक्त ४०० हेक्टरवर ऊस दिसून येत आहे.
हेही वाचा…विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
तुरीने वाढवले जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे टेन्शन
गोंदिया जिल्ह्यात तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यःस्थितीत असलेले थंड हवामान व मागील काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण हे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या व पाने गुंडाळणाऱ्या अळींच्या वाढीस पोषक ठरत आहे. यामुळे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. जिल्हा धान उत्पादक असला तरी आता येथील शेतकरी धानाच्या शेतीला जोड पिकांची लागवड करीत आहे. अशात तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी तुरीची लागवड करू लागला आहे. जिल्ह्यात ५,६४४.६२ हेक्टर तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र असून, यंदा ४,७३८ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे. तुरीचे उत्पादन घेऊन त्यातून काही नफा कमाविण्याच्या विचारात शेतकरी असतानाच मात्र तुरीवर आता अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तूर सध्या फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच त्यावर शेंगा पोखरणाऱ्या व पाने गुंडाळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरण व थंड हवामान अळींसाठी पोषक ठरले असून, तुरीवर त्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे मात्र आता शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
९ डिसेंबर पर्यंत झालेला पेरा
ज्वारी – ३१५ हेक्टर
गहू – ५८७ हेक्टर
हरभरा- ३३९७ हेक्टर
मका – १६९७ हेक्टर
जवस- ६९० हेक्टर
करडई – ३२ हेक्टर
मोहरी – ८९० हेक्टर
तीळ- ०६ हेक्टर