गोंदिया : गोंदियाचा रेल्वे उड्डाण पूल दीड वर्षांपूर्वीच पाडण्यात आला. नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी शासनाच्याच दफ्तर दिरंगाईमुळे गोंदियाच्या रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम शासकीय कार्यालयात अडकून पडले आहे. त्यामुळे गोंदियातील रहिवासी एकाच उड्डाण पुलावरून धोकादायक प्रवास करत असल्याने प्रवाशांचीही मोठी समस्या बनली आहे.
गोंदिया-कोहमारा आणि बालाघाट या जिल्हा मुख्यालयाला जोडणारा रेल्वे पूल ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला होता. तो बराच जीर्ण झाला होता, तरीही या जीर्ण पुलावरून वाहतूक सुरू होती. सुरक्षेच्या दृष्टीने तत्कालीन जिल्हादंडाधिकारी नयना गुंडे यांनी २ मे २०२२ रोजी या पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. सूचनांनुसार जून-जुलै २०२२ मध्ये पूल पाडण्यात आला. या वेळी पूल पाडल्यानंतर तातडीने नवीन पूल बांधला जाईल, असे वाटत होते मात्र तसे होऊ शकले नाही.
हेही वाचा – अमरावती: कंत्राटीकरणाचा विरोध! स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया यांच्यामार्फत नवीन उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या पुलासाठी शासनाने ४७ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच सप्टेंबर महिन्यापासून नवीन उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती, मात्र नवीन उड्डाण पुलाची प्रक्रिया शासकीय कार्यालयातच अडकून पडली आहे. शहरातील एकमेव उड्डाण पुलावरून वाहतूक केली जात आहे. मात्र या पुलाच्या अरुंदपणामुळे दर दहा मिनिटांनी वाहतूक कोंडी होते. वाढत्या रहदारीमुळे या उडत्या पुलावर अनेक अपघात झाले आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी एका तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा पूल केवळ शहरवासीयांसाठीच नव्हे तर या उडण पुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठीही धोक्यापेक्षा कमी नाही.
४७.६८ कोटी रुपये खर्चून ५५३ मीटरचा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या संदर्भात या नवीन रेल्वे उड्डाण पुलासाठी शासनाकडून ४७.६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. या निधीतून ५५३ मीटर लांबीचा नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. मात्र निधी मंजूर होऊन दीड वर्ष उलटून गेले तरी बांधकामाला अद्याप गती मिळालेली नाही.
हेही वाचा – ऑक्टोबर हीट’चे चटके वाढले, अकोल्यात बुधवारी सर्वाधिक ३७.२ अंश तापमान
निविदा प्रक्रिया पूर्ण
या उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात १५ कोटींहून अधिक निधीतून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलासाठी शासनाच्या संबंधित मंत्रालय स्तरावरून कार्यादेश मंजूर करण्यात आला आहे. शासनस्तरावरील प्रक्रिया पूर्ण होताच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. – नरेश लभाणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया