गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर काचेवानी येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलव्हॅन (क्रमांक एम.एच.३५- ए .जी. १७१५) उलटल्याने झालेल्या अपघातात व्हॅनमधील १३ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना गुरुवारी ३० जानेवारीला सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. निष्काळजीपणाने वाहन चालवीत असल्याबद्दल सुनील रणजित श्रीबंशी (२४) रा. पालडोंगरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गंगाझरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास आदिशक्ती पब्लिक स्कूल काचेवानीची व्हॅन विद्यार्थ्यांना शाळेत नेत असताना सेजगाव-नहरटोलाजवळ स्कुलव्हॅनला अपघात झाला. यात व्हॅनमध्ये बसलेले १३ विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान स्कूलव्हॅनला अपघात झाल्याचे कळताच पालक घाबरले. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलांना जवळील रुग्णालयात दाखल केले. काही जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथे हलविण्यात आले.

जखमींची नावे

अपघातात जखमी झालेल्या मुलांची नावे पुढीलप्रमाणे – अक्षित जितेश अंबुले (४) रा. बिविटोला, सानवी जितेश अंबुले (७) रा. बिविटोला, तोषांत जागेश्वर रहांगडा‌ले (६) रा.सोनेगाव, गुंजन अरविंद रहांगडाले (८) सोनेगाव, दाक्षी गोविंद कुमार रहांगडाले रा. सोनेगाव, शिवन्या अजय कुमार भगत रा. सोनेगाव, क्रिश कृष्णा रहांगडाले डीबेटोला, रेखा धनंजय भगत सोनेगाव, शिवम मेश्राम सोनेगाव, दिनल सुभाष रहांगडाले, लक्ष कृष्णकुमार पटले रा. सोनेगाव, आदी अरुण बोपचे आणि भावी भरतलाल रहांगडाले. एकूण १३ विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. पालकांच्या तक्रारीवरून वाहनचालक सुनील श्रीबांशी याला गंगाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास गंगाझरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक वर्मा यांच्या मार्गदर्शनात हवालदार सुभाष हिवरे, राकेश भुरे हे करीत आहेत.

पोलिसांच्या वाहनाला घेराव

अपघात झाल्यानंतर या ठिकाणी दाखल झालेल्या गांगझरी पोलीस वाहनाला पालकांनी घेराव घातला. त्यामुळे तेथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती, पण पोलिसांनी समजूत काढल्यानंतर स्थिती नियंत्रणात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia school van accident 13 students injured sar 75 ssb