गोंदिया : पोलीस दलात सेवारत असलेल्या वडिलांचा दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या जागी आई पोलीस दलात भरती झाली. मात्र, शिवशाही बस अपघातात तिचाही मृत्यू झाला. नियतीच्या या आघातामुळे सहा वर्षांचा चिमुकला पोरका झाला. कोहमारा– गोंदिया मार्गावर डव्वा–खजरी गावाजवळ शुक्रवारी झालेल्या शिवशाही बसच्या भिषण अपघातात ११ प्रवासी ठार व २९ प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव येथील रहिवासी स्मिता सूर्यवंशी (३२)या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मिता सूर्यवंशी यांचे पती विक्की सूर्यवंशी पोलीस विभागात सेवारत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांचे आजाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या सासू-सासऱ्यांसोबत आपल्या सहा वर्षांच्या मुलासह राहात होत्या. पतीच्या निधनानंतर दोन-तीन महिन्यापूर्वीच त्यांना पोलीस विभागात अनुकंपा तत्वावर नोकरी लागली. त्या पोलीस मुख्यालय गोंदिया येथे शिपाई म्हणून सेवारत होत्या. कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गावी आलेल्या स्मिता २९ नोव्हेंबरला कर्तव्यावर रुजू होण्याकरिता अर्जुनी मोरगाववरून बसने साकोलीला जाण्यासाठी निघाल्या. साकोलीवरुन गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात हजर होण्याकरिता त्या भंडारा-गोंदिया शिवसाही बसमध्ये बसल्या. कोहमारा– गोंदिया मार्गावर डव्वा–खजरी गावाजवळ बसला भिषण अपघात झाला. यात स्मिता यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबीयांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचा सहा वर्षांचा चिमुकला आता आई-वडिलांविना पोरका झाला आहे.

हेही वाचा : पैशांसाठी तगादा लावल्‍याने शीर धडावेगळे केले, हत्‍या प्रकरणाचे गूढ…

या अपघातात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईंजोरी येथील शंकर देवा हुकरे, रामकला शंकर हुकरे, बोंडगांवदेवी येथील राहुल मधुकर कांबळे, सोमलपूर येथील टिना यशवंत दिघोरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia shivshahi bus accident 6 year old boy lost parents mother joined police force 6 months ago sar 75 css