गोंदिया : सडक/अर्जुनी, कोहमारा मार्गे गोंदियाला जात असलेल्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या ११ वर गेली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया मार्गावर डव्वा गावाजवळ शिवशाही बस (क्रमांक एम.एच.०९ इ एम १२७३) उलटून अपघात झाला. सुरुवातीला त्यात ८ प्रवासी मृत्यूमुखी पडले असे सांगण्यात आले होते. पण हा आकडा आता ११ वर गेला आहे. सुमारे ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ झाला.

हेही वाचा – चालकाला डुलकी …मालवाहक वाहन उलटले, अन फरफटत गेले…

मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया येथे बस उलटल्यानंतर आतापर्यंत ११ मृतदेह ग्रामस्थांद्वारे बसमधून बाहेर काढण्यात आले. भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व ती उलटली. जवळपास २० फूट रस्त्यापासून बाजूला घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. ३० प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतदेह गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात आणले असून गंभीर जखमींना गोंदिया शासकीय महाविद्यालयात दाखल केले जात आहे.

गावकरी मदतीला धावले

अपघाताची बातमी कळताच डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपारचे पोलीस निरीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले व मदत कार्याला सुरुवात केली. जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा – तिकीट वाटपातील घोळामुळे काँग्रेसचा पराभव! राजकीय वर्तुळात…

काही काळ वाहतूक ठप्प, नंतर सुरळीत

दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही काळापूर्ती ठप्प झाली होती. गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी लगेच घटनास्थळी दाखल होत या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या घटनेची माहिती मिळताच गोंदियाचे नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल माजी आमदार राजेंद्र जैन शासकीय महाविद्यालयात पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भंडारा आगारातील प्रशासकीय पथक पण घटनास्थळी दाखल झालेले आहे.