रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी २४ तास दक्ष असणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकवेळा मानधन जमा करण्याची मागणी करण्यात आली, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर जिल्ह्यात १०२ रुग्णवाहिकेचे ७६ चालक कर्तव्य बजावत असून गेल्या सहा माहिन्यांपासून हे चालक मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.

गंभीर आजाराने ग्रासलेल्या आणि आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना रुग्णवाहिका सेवा दिली जाते. त्यासाठी रुग्णवाहिका चालकांना प्रत्येक क्षणी सतर्क राहावे लागते. यापूर्वी ‘एनआरएचएम’मधून रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती होत होती, मात्र गेल्या तीन वर्षांपासून खासगी कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीवर चालकांची नियुक्ती दिली जात आहे.

कमी मानधनामुळे वाहनचालक आधीच आर्थिक संकटात –

विशेष म्हणजे, रुग्णवाहिका चालकांना महिन्याकाठी १३ हजार ५०० रुपये मानधन दिले जात असून, त्यापैकी पीएफ व इतर योजनांतर्गत मानधन कपात करून ९००० रुपये चालकांच्या खात्यात जमा होतात. कमी मानधनामुळे वाहनचालक आधीच आर्थिक संकटात जात असून, अशा परिस्थितीत गेल्या ६ महिन्यांपासून म्हणजे मार्च २०२२ पासून आतापर्यंत मानधन मिळालेले नाही. त्यामुळे चालकांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

‘एनआरएचएम’ अंतर्गतच रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती करावी –

गोंदिया जिल्ह्यात ७६ रुग्णवाहिका चालक आहेत. तीन वर्षांपासून खासगी संस्थेतून रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती केली जात आहे. तर, ‘एनआरएचएम’ अंतर्गतच रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती करावी, अशी संघटनेची मागणी आहे. त्याचबरोबर मागील ६ महिन्यांचे थकीत मानधन तात्काळ चालकांच्या खात्यावर जमा करावे, असे निवेदन देण्यात आले आहे,असे कंत्राटी चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर चंद्रिकापुरे यांनी सांगितले.

Story img Loader