गोंदिया: जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे यांना गावकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी या गावात उपसा सिंचनाच्या लोकार्पणसाठी ते गेले होते. मात्र, श्रेय लाटण्यासाठी अर्धवट बांधकामाचे लोकार्पण केले जात असल्याचा आरोप करीत संतप्त गावकऱ्यांनी आमदार कोरोटे यांना लोकार्पण न करताच आल्यापावली परत पाठवले. यावेळी ‘आमदार कोरोटे मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
सालेकसा तालुक्यातील ग्राम पांढरवाणी येथे बाघ पाटबंधारे विभागाकडून सुमारे दोन कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन योजना उभारण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेचे ३५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. यातून परिसरातील फक्त ३० टक्के शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. अर्थात उर्वरित ७० टक्के शेतकऱ्यांना या योजनेचे काम पूर्ण झाल्यावर लाभ घेता येईल. यामुळे संपूर्ण काम झाल्यावरच त्याचे उद्घाटन करणे गावकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र, केवळ श्रेय लाटण्याच्या उद्देशाने या अर्धवट योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार कोरोटे येथे आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कारण, या उद्घाटनाची माहिती ग्रामपंचायत सरपंच, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाला देण्यात आली नव्हती.
यामुळे गावकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांच्या शेतात जोपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश करू देणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी याप्रसंगी दिला. ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावर झाडे आडवी टाकली आणि रस्ता अडवून काम पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करू नये, असा पवित्रा घेत आमदार कोरोटे यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी कोरोटे यांच्या वाहनासमोर ‘आमदार मुर्दाबाद’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
आजी-माजी आमदारांमध्ये विकासकामांच्या लोकार्पणाची स्पर्धा
देवरी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार सहेसराम कोरोटे आणि माजी आमदार संजय पुराम यांच्यात गेल्या वर्षभरापासून आपापल्या कार्यकाळातील विकासकामांच्या लोकार्पणावरून स्पर्धा रंगली आहे. यामुळे आमदार कोरोटे गेल्या काही दिवसांपासून न केलेल्या कामांचेही श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याची चर्चा मतदारांसह राजकीय वर्तुळात सुरू आहे. याची प्रचिती देवरी येथील अपूर्ण असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनाच्यानिमित्ता आली होती.