गोंदिया: गोंदिया जिल्ह्यासह गोंदिया तालुक्यात रविवार २१ जुलैपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच नदी काठावरील मरारटोला कासा-काटी मार्गावरील वैनगंगा व बाघ नदीला पूर आल्याने मार्ग बंद झाले आहेत. पुरामुळे मार्ग बंद झाल्याने या गावातील गरोदर महिला आरोग्याच्या सोयीपासून वंचित राहू येऊ नये, यासाठी प्रसंगावधान राखत ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे हलविण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने गरोदर महिलांना हलविल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र काटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राथमिक आरोग्य केंद्र काटी अंतर्गत उपकेंद्र कासा कार्यक्षेत्रातील सहा गरोदर महिलांंपैकी ग्राम कासा येथील भारती चौधरी, करीना पाचे, अनसती पाचे, गुणिता चमटे, निशा मातरे, गीता चौधरी यांची अपेक्षित प्रसूतीची तारीख जवळ असताना वेळेवर गुंतागुंत होऊ नये म्हणून तात्काळ रजेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमर खोब्रागडे यांनी दिली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून नदीकाठच्या गांवांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशसुद्धा दिले आहेत.

हेही वाचा – पोलिसांना ‘हा’ अधिकारच नाही, माहिती अधिकारातून सत्य उघड

मंगळवार २३ जुलै रोजी गोंदिया तालुक्यातील कासा-काटी या अतिवृष्टी व पूरग्रस्त गावामध्ये आरोग्य प्रशासनाच्या आरोग्य चमूमध्ये गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहजादा राजा, प्राथमिक आरोग्य अधिकारी काटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे, सामुदायिक आरोग्य अधिकारी शिवानी सोनवाने, तालुका आरोग्य सहायक आत्माराम वंजारी, आरोग्य सहाय्यक ताजने, आरोग्य सेविका दंधारे, आरोग्य सहायिका चाचेरे, स्टाफ नर्स यादव, आशा सेविका अंजीरा खैरवार, किरण चौधरी व सुनिता जमरे यांनी विशेष तत्परतेने सर्व सहा गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे हलविण्यात पुढाकार घेतला. ग्रामीण रुग्णालय रजेगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुप्रिया बोरकर यांनी सहाही गरोदर मातांना भरती करुन आरोग्य सेवा प्रदान केली आहे.

हेही वाचा – भाजपच्या माजी खासदाराने ठोकला पक्षाला रामराम ; पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का

नदी काठावरील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच पूरग्रस्त गावे ज्यांचे मार्ग पावासामुळे कधीही बंद होऊ शकतात अशा सर्व गावांतील आशा सेविका, आंगणवाडी सेविका यांनासुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर महिलांना सुरक्षित स्थळी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचविण्याची सूचना जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gondia wainganga bagh river rises six pregnant women were transferred to hospitals sar 75 ssb