गोंदिया : खाजगी शाळेतील शिक्षणाचा स्तर तसेच तेथे पुरवण्यात असणाऱ्या सोयी सुविधा या पालक वर्गाकरिता आकर्षणाच्या विषय झाला असल्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या पट संख्येचा प्रश्न उपस्थित झाला होता. पटसंख्या अभावी काही शाळेत वर्ग बंद करण्याची तर काही शाळाच बंद करण्याची नामुष्की ओढावली होती.
गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी एक उपक्रम सुरू करण्यात आला . या उपक्रम अंतर्गत गुढीपाडव्याच्या निमित्ताने गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ अभियान राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील तब्बल सात हजार ५३६ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिल्या वर्गात प्रवेश घेतला आहे.
‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ उपक्रमांतर्गत ३० मार्च आणि ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील गावागावात गुढी उभारून मिरवणूक आणि दिंडी काढून याबाबत पालक वर्गात जनजागृती निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ उपक्रमांतर्गत शाळांत रथगाडी, बैलबंडीवर गुढी सजवून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गावात पालक वर्ग मोठ्या आनंदाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात गुढी उभारून करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डी.जे.च्या तालावर मिरवणूक काढून आगळा वेगळा पद्धतीने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापकांनी शाळेतील राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ या उपक्रमामुळे शिक्षणाबद्दल जागृती निर्माण झाली असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. पालकांनी जिल्हा परिषद शाळेमध्येच आपल्या पाल्यांना शिकवू, असा निर्धार केला. यामुळे जि.प.शाळांची पटसंख्या वाढविण्यास मदत होणार आहे.
प्रत्यक्ष दाखल झाले ७५३६ विद्यार्थी
“गुढी पाडवा प्रवेश वाढवा” उपक्रम अंतर्गत एकाच दिवशी तीन हजार ७५० मुले तर तीन हजार ७८६ मुली असे सात हजार ५३६ विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल झाले. यात आमगाव तालुक्यातील ७६६, अर्जुनी-मोरगाव ९६०, देवरी ८६४, गोंदिया १८२८, गोरेगाव ८०५, सडक-अर्जुनी ७०९, सालेकसा ६३७ व तिरोडा तालुक्यात २६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे . या विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला आहे.