गोंदिया : तिरोडा तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शिक्षकाने शाळेतीलच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारी वरून तिरोडा पोलिसांनी आरोपी शिक्षकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उमेश टीकाराम मेश्राम (५०) रा. मेंढा ता. तिरोडा जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पिडीता ही तिरोडा तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे.

आरोपी उमेश मेश्राम हा याच शाळेत वर्ग पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवितो. २२ ऑगस्ट रोजी पिडीता ही शाळेला सुट्टी झाल्यानंतर घरी आली. गणवेश बदलून ती घरात खुर्चीवर बसली असता शिक्षक उमेशही तिथे आला व तिला मिठी मारली. अश्लील चाळे केले. पिडीता प्रचंड घाबरली, तिने आरोपीच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका केली.यानंतर पीडीतेचा भाऊ आल्यानंतर आरोपी त्याच्यासोबत बोलत बसला. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजे नंतर त्याने पीडितेच्या व्हाट्सअपवर एक अश्लील संदेश पाठविला.

हेही वाचा…विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग

दरम्यान पीडीतेने घडलेला सर्व प्रकार तिच्या मावस भावाला सांगितला. दुसर्‍या दिवसी त्याने शाळा गाठून आरोपी शिक्षक उमेशला जाब विचारला. दरम्यान त्या शिक्षकाने माफी मागितली व घडलेला प्रकार कृपया कोणालाही सांगू नका, अशी विनंती केली. पिडीता या प्रकाराने प्रचंड तणावात होती. यानंतर तिने ३० ऑगस्ट रोजी घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. व त्याच दिवशी कुटुंबीयांसह तिरोडा पोलीस स्टेशन गाठून आरोपी उमेश विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शिक्षक उमेशवर गुन्हा दाखल करून मध्यरात्री च्या सुमारास अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात तिरोडा पोलिस करीत आहेत.

हेही वाचा…‘लाडकी बहिण’ चा प्रचार सुरू असताना गडकरींची चित्रफित व्हायरल, निवडणुका जिंकण्यासाठी ‘रेवडी’ वाटल्याने…

आरोपी शिक्षक उमेश मेश्राम गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत तिरोडा तालुक्यातील सुकळी (डाक) येथे कार्यरत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याचे कळताच गोंदिया शिक्षण विभागाने तत्काळ प्रभावाने आरोपी शिक्षक मेश्रामला निलंबित केले आहे.