चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येत गेल्या दोन वर्षांत २० हजारांची घट झाली. महाविद्यालयांत संपूर्ण सत्रात १० टक्के विद्यार्थीदेखील उपस्थित नव्हते. ही चिंताजनक बाब असल्याचे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी म्हटले आहे. विद्यार्थी गळती रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा बहुसंख्य महाविद्यालयांना विद्यार्थ्यांअभावी टाळे लागतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गोंडवाना विद्यापीठाचा मागील १४ वर्षांचा आलेख सातत्याने उतरता राहिला आहे. आता विद्यार्थी संख्या दरवर्षी कमी होत असल्याने विद्यापीठाच्या एकूणच कारभारावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची अवस्था फारच वाईट आहे, असे दस्तुरखुद प्राचार्यच बोलत आहेत. गोंडवाना विद्यापीठाशी १९० महाविद्यालये संलग्न आहेत. यातील बोटावर मोजण्याइतकी महाविद्यालये वगळता बहुसंख्य महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची उपस्थिती दहा टक्केदेखील नव्हती.
एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची १० टक्के उपस्थिती नसणे चिंताजनक बाब असल्याचे सांगितले. सत्र पद्धती, नवीन शैक्षणिक धोरणाची नियोजनशून्य व चुकीची अंमलबजावणी, यांमुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका सेवानिवृत्त प्राचार्यांनीही वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती नगन्य असते, असे सांगितले. विद्यार्थ्यांना वर्गात बसवून ठेवणे आजमितीस कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.
महाविद्यालयात आज बीए, बीकॉम, बीएससी, एमएससी, एम.ए, एलएलबी, फॅशन डिझाईनपासून तर एमबीए, डीबीएम, जनसंवाद तथा विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. मात्र, विद्यार्थी वर्गात कमी, तर महाविद्यालय परिसरात किंवा कँटिणमध्ये अधिक दिसतो. आज अनेक अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीपेक्षा अधिक वाढले आहे. त्याचाही फटका अनेक महाविद्यालयांना बसला आहे. ग्रामीण भागांतील काही महाविद्यालय तर नावालाच सुरू आहेत. वर्गखोल्या आहेत, मात्र विद्यार्थी नाही, ते केवळ हजेरीपटावरच दिसतात, असे चित्र येथे पहावयास मिळते.
प्राचार्यांची तारांबळ
विद्यापीठाने कोणत्याही परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती दाखवताना प्राचार्यांची चांगलीच तारांबळ उडते. बहुसंख्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ही सत्यस्थिती असल्याचे सांगितले, मात्र भीतीपोटी आणि विद्यापीठाकडून असहकाराचे धोरण राबवले जाईल म्हणून नाव प्रकाशित करण्यास स्पष्ट नकार दिला.
गलेलठ्ठ पगार, पण….
विज्ञान, समाजकार्य तसेच जिथे प्रॅक्टिकल असते, तेथील विद्यार्थी वर्गात कमी आणि प्रयोगशाळेत किंवा ‘फिल्डवर्क’वर दिसणे एकदाचे समजून घेता येईल. मात्र, मराठी, इंग्रजी, वाणिज्य, विज्ञान, जनसंवाद व अभियांत्रिकी महाविद्यालयांतही विद्यार्थी वर्गात न दिसणे हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. बहुसंख्य प्राचार्य व प्राध्यापक केवळ गलेलठ्ठ पगार मिळतो म्हणून या महाविद्यालयांत कार्यरत आहेत. त्यांना विद्यार्थी संख्या किंवा विद्यार्थ्यांची वर्गात अनुपस्थिती, याच्याशी काहीही देणेघेणे नाही.