चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यात २०० एकरमध्ये गोंडवाना विद्यापीठाची भव्य वास्तू उभारण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा (फॉरेस्ट ॲन्ड ट्रायबल युनिव्हरसिटी) दर्जा देण्याबाबतचे विधायक येत्या जुलै महिन्यात आणणार असल्याची माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी वन अकादमी येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुनगंटीवार यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासंदर्भात माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली. गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात काम पूर्ण होत आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात २०० एकर विस्तीर्ण परिसरात गोंडवाना विद्यापीठाची भव्य वास्तू उभी राहणार आहे. याच विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यात येणार आहे. या विद्यापीठात या भागातील विस्तीर्ण जंगल,स्थानिक आदिवासी, जंगलात वास्तव्य करणारे वाघ, बिबट तथा विविध वन्यप्राणी व जंगल आणि आदिवासी व आदिवासी संस्कृति यावर अभ्यास केला जाणार आहे.
या मार्च महिन्यातच या विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. येत्या जुलै महिन्यात विधेयक मांडण्यात येणार आहे. वन व आदिवासी विद्यापीठ जागतिक दर्जाचे राहणार आहे. विविध विषयांवरचा अभ्यासही या ठिकाणी करता येणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनाही निमंत्रीत केले जाणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. अतिशय उत्तम दर्जाचे विद्यापीठ तयार करण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. आज जिथे हा कार्यक्रम होत आहे त्या वन अकादमीच्या धर्तीवरच गोंडवाना विद्यापीठातील हे वन व आदिवासी विद्यापीठ राहणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.