चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने ३० जागांकरिता पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीत स्थानिक आणि विदर्भातील उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक उमेदवारांना डावलून विदर्भ व राज्याबाहेरील उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रामध्ये त्रुटी असतानाही निवड करण्यात आल्याने भरतीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदभरतीच्या जाहिरातीनुसार एससी (१), व्हीजे -ए (१), एनटी-बी (१), एनटी-सी (२), एनटी-डी (१), एसबीसी (१), ओबीसी (९), ईडब्ल्यूएस (३) व खुला (११) असे आरक्षण होते. या सर्व जागांसाठी मराठी भाषेत उमेदवार प्राविण्य असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. गडचिरोली हा विदर्भातील मागास जिल्हा असून येथील विद्यापीठात स्थानिक किंवा विदर्भातील उमेदवारांना प्राधान्य देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात विदर्भ व राज्याच्या बाहेरील उमेदवारांची निवड करण्यात आली. हा स्थानिक उमेदवारांवर मोठा अन्याय आहे.

हेही वाचा – “गडकरींचे व्यक्तिमत्त्व राज कपूरसारखे, छोटे स्वप्न… ”, काय म्हणाले फडणवीस?

हेही वाचा – बुलढाणा : काय सांगू भाऊ, मजुरीचे दर वाढले, पण मजूरच मिळेना! हजारो सोयाबीन उत्पादकांची दैना

निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. काही विषयांच्या मुलाखतीमध्ये पात्रता नसलेल्या विषय तज्ज्ञांना बोलविण्यात आले होते. हा सर्व प्रकार नियमबाह्य असल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने करण्यात आला आहे. अनेक उमेदवार नेट-सेट तसेच पीएचडी झालेले आहेत. त्यांना अध्यापनाचा अनुभवदेखील आहे. मात्र त्यांची निवड न करता क्षेत्रातील अद्ययावत बाबींचे ज्ञान नसलेल्या अनेक उमेदवारांची निवड झाल्याचे धक्कादायक आहे. जाहिरातीनुसार महिला आरक्षण योग्यरित्या पाळण्यात आले नाही. पारदर्शक उमदेवारांची यादी प्रकाशित करण्यात यावी व सर्व उमदेवारांची गुणदान यादी प्रकाशित करावी, निवड समितीमध्ये आरक्षित वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते का याची शहानिशा करण्यात यावी. निवड झालेल्या उमेदवारांना सुट्टीच्या दिवशी परस्पर मेल पाठवून बोलवण्यात आले ती यादी गोंडवाना विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रकाशित करावी. उच्चविद्याविभूषित उमदेवार मुलाखतीला आले असताना त्यांना डावलून काही विशिष्ट लोकांना निवड करण्याचे कारण काय, उमदेवारांची मुलाखत होऊन दोन महिने निकाल जाहीर न करण्याचे कारण काय, गोंडवाना विद्यापीठातून आचार्य पदवीप्राप्त उमेदवाराची निवड करण्यात आलेली नाही. सर्व विषयतज्ञ हे मुलाखतीसाठी आभासी पद्धतीने का होते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पेटकर, सचिव प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर व अन्य सदस्य उपस्थित होते.