नागपूर : कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सरकारकडूनच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे तेथील नागरिकांना मिळतात. अमेरिकेसह भारतात मात्र शासकीय व खासगी अशा दोन यंत्रणेकडून उपचाराची सोय आहे. त्यामुळे येथे बऱ्याच समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते, असे मत कॅनडातील ‘द आटोवा’ रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. स्मिता पखाले यांनी केला.‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्या बोलत होत्या. डॉ. पखाले या मुळ वाशिमच्या असून त्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. सध्या कॅनडात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. पखाले पुढे म्हणाल्या, कॅनडा आणि इंग्लंडचे (ब्रिटन) सरकार त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) १० टक्के खर्च निधी हा आरोग्यावर करते. अमेरिका हा १७ टक्के खर्च करते. परंतु, भारत हा देश कॅनडा, इंग्लंडच्या तुलनेत निम्मेही खर्च करत नाही.
कॅनडा, इंग्लंड या देशात संपूर्ण आरोग्य यंत्रणा सरकारच्या अखत्यारित आहे. येथे रुग्णांना कोणताही आजार झाल्यास सरकारच सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते. रुग्णांना उपचारावर एकही रुपया खर्च करावा लागत नाही. उलट अमेरिका आणि भारतात मात्र शासकीय आणि खासगी अशा दोन्ही पद्धतीच्या उपचाराची सोय आहे. अमेरिकेत खूप गरीब आणि वृद्धांनाच शासकीय रुग्णालयात उपचाराची मुभा आहे. तेथे खूप श्रीमंत आणि गरीब अशी मोठी दरी आहे. त्यामुळे गरीब लोक उपचारासाठी टाळाटाळ करतात. रुग्णालयात गेल्यास एक दिवसाची मजूरी बुडल्यास खायचे काय? हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. सोबत अमेरिकेत गरीबांसह मध्यमवर्गीय उपचाराला लागणारा खर्च बघता नागरिक उपचारासाठी डॉक्टरांकडे जायला टाळाटाळ करतात.
हेही वाचा : नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध ; अधीक्षक पदासाठी काहींची ‘मोर्चेबांधणी’
कॅनडा व इंग्लंडमध्ये मात्र संपूर्ण उपचार मोफत असल्याने थोडाही कुणाला त्रास झाल्यास ते झटपट डॉक्टरांकडे जाऊन पहिल्या टप्यातच संबंधितांच्या आजाराचे निदान करतात. त्यानंतर वेळीच रुग्ण बरा होतो. संपूर्ण आरोग्याची काळजी इंग्लंड व कॅनडात सरकार उचलत असल्याने तेथे गंभीर होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असून रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी आहे. उलट अमेरिकेत गंभीर होणाऱ्या रुग्ण व मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याचेही डॉ. पखाले यांनी सांगितले.
मानसिक आरोग्य व आयुर्मानावरही परिणाम
कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सरकारकडून आरोग्याच्या काळजीसह कुणा कुटुंबात बाळाचा जन्म झाल्यास त्याच्या भविष्यातील शिक्षणही मोफत दिले जाते. त्यामुळे येथील नागरिकांना स्वत:च्या आरोग्याची चिंता नसण्यासह मुलांच्या शिक्षणाचीही चिंता नाही. त्यामुळे निश्चितच विषमता कमी राहण्यासह नागरिकांचे मानसिक आरोग्य चांगले असून आयुर्मानही ऐंशीहून अधिक आहे. उलट अमेरिकेत मात्र दोन पद्धतीच्या उपचाराची सोय असल्याने विषमता जास्त असण्यासह आरोग्य यंत्रणेशी संबंधित नागरिकांचा खर्च जास्त आहे. त्यामुळे निश्चितच अमेरिकेत मानसिक आरोग्यासह आयुर्मानही सुमारे १० वर्षांनी कमी असल्याचा दावा डॉ. पखाले यांनी केला.
हेही वाचा : सणासुदीत हाॅटेल व्यावसायिकांना १०० कोटींचा फटका!
सौंदर्याशी संबंधित उपचाराचा खर्च मात्र नागरिकांवर
कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सगळ्या रुग्णांच्या आरोग्याचा खर्च सरकार उचलत असले तरी मानवाचे सौंदर्य फुलवण्याशी संबंधित ‘मॅक्सिकोफेशियल’ शस्त्रक्रियांसह इतर उपचाराचा खर्च मात्र संबंधित नागरिकांनाच करावा लागतो.
उपचाराची पद्धत
कॅनडा आणि इंग्लंडमध्ये कुणाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रथम त्याला सरकारी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांशी संपर्क करावा लागतो. येथे सामान्य रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन गरज भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे रेफर केले जाते. तेथे प्रतिक्षा यादीनुसार तज्ज्ञांकडून उपचार दिले जातात. उलट जास्तच त्रास असलेल्या रुग्णांना थेट आकस्मिक विभागात उपचाराची सोय असते. यावेळी कुणाच्या आरोग्य विम्याची मुदत संपली असल्यावरही त्यावर मोफतच उपचाराचा नियम आहे.