नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी बनवलेल्या वस्तू अजनी रेल्वे स्थानकावर विकण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त अजनी रेल्वे स्थानकावर ‘एक स्टेशन एक उत्पादन’ योजनेअंतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी बनवलेल्या हस्तनिर्मित वस्तूंचा विक्री करण्यासाठी एक स्टॉल उघडण्यात आला आहे.
या स्टॉलचे उदघाटन उपमहानिरीक्षक (कारागृह) स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, नागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनुप कुमार कुमरे, अजनी रेल्वे स्थानक व्यवस्थापक माधुरी चौधरी उपस्थित होते. स्टॉलवर विक्रीसाठी लाकडी वस्तू, लोखंडी वस्तू, कॉटन बेडशीट, टॉवेल आणि इतर सजावटीच्या वस्तू यांसारखी हस्तनिर्मित उत्पादने उपलब्ध आहेत. सर्व नागरिकांसाठी स्टॉल सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुला राहील.