नागपूर : मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटून आलेल्या एका कुख्यात गुंडाचा त्याच्या प्रेयसीसमोरच मित्राने धारदार शस्त्राने भोसकून खून केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गेल्या १० दिवसांतील उपराजधानीतील पाचवे हत्याकांड आहे. विक्की चंदेल असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे, तर राकेश पाली असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांचा वचक संपल्यामुळे नागपुरात गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्यामुळे नागपुरात गुंडाराज सुरू झाले असून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दर दुसऱ्या दिवशी एक हत्याकांड घडत असल्याने उपराधानीतील नागरिक वेगळ्याच दशहतीत जगत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश पाली, संजय वाघाडे आणि विक्की चंदेल तिघांनीही काही २०१३ मध्ये आशीष बुधवाबरे नावाच्या युवकाचा भरचौकात खून केला होता. त्याच हत्याकांडात तिघांनाही आजीवन कारावासाची शिक्षा झाली होती.
हेही वाचा >>> लग्नानंतर लगेच उसवताहेत ‘प्रीतीचे धागे’!
गेल्या डिसेंबर महिन्यात दोघेही कारागृहातून पॅरोलवर सुटून आले होते. विक्कीने गेल्या आठवड्यात राकेशचा भाचा शुभम याला शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. त्याने मामा राकेशकडे तक्रार केली. त्यामुळे चिडलेल्या राकेशने विक्कीचा काटा काढण्याचा कट रचला.बुधवारी रात्री बारा वाजता पार्वतीनगरात विक्की चंदेल हा प्रेयसीला घेऊन आला होता. त्याने शुभमशी पुन्हा वाद घालून कानशिलात लगावली होती. शुभमने मामा राकेशला सांगितले आणि पार्वतीनगरात बोलावले. विक्की प्रेयसीसह तेथे पोहचला.
हेही वाचा >>> नागपूर : मांजामुळे गळे कापल्यानंतरच का जागी होते यंत्रणा?
राकेशने साथीदारांच्या मदतीने विक्कीला घेरून तलवार-चाकूने भोसकून त्याचा प्रेयसीसमोरच खून केला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शुभम कोकस वर्मा, दिलीप पाली, लालू पाली आणि सोमू पाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी राकेश पालीचा पोलीस शोध घेत आहेत.