तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एसटी कर्मचारी आंदोलनात सहभाग घेणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शिंदे सरकारला घरचा अहेर दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे हे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे सांगत आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>>नागपूर: सावरकरांचा अपमान करणाऱ्यासोबत फिरणारे बाळासाहेबांचे वारसदार कसे?; भाजपच्या चित्रा वाघ यांचा सवाल
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य स्थापन झाला. या संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर तर मुख्य कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत. संघाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत एसटी कर्मचारी विलीनीकरण आंदोलना दरम्यान मान्य केलेल्या १६ मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यावरही अद्याप काही झाले नाही. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणाचा इशारा दिला गेला. पत्रात मुख्यमंत्र्यांना एसटी आंदोलनादरम्यानच्या घटना आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवन करून दिली गेली.
हेही वाचा >>>वर्धा: सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी आशा बोथरा
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन झाली. यावेळी १८ पैकी १६ मागण्या मान्य केल्या गेल्या. परंतु सहा महिन्यांपासून त्यावर काहीच कारवाई नाही. याविषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी १८ ला चर्चा केल्यावरही निर्णय सोडा बैठकही घेतली जात नाही. मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद नसल्याने १९ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे संघाने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>‘आश्रमशाळा टू अमेरिका’; गडचिरोलीच्या भास्करचा प्रेरणादायी प्रवास; आदिवासी समाजातील व्यक्तीची वैज्ञानिकपदी निवड
“एसटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी दीर्घकालीन लढा दिला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या. या सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना न्यायाची अपेक्षा होती. परंतु परिवहन खाते असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीचे आश्वसन देऊन काहीच करत नाही. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण करावे लागणार आहे.”- सदाभाऊ खोत, माजी कृषी राज्यमंत्री.