लोकसत्ता टीम
नागपूर: भाजपने मंत्रिपद न दिल्याने नाराज असल्याची चर्चा असलेले आमदार गोपीचंद पडळकर बुधवारी विधान भवन परिसरात आले. त्यांनी येथे पत्रकारांपुढे आपली भूमिका स्पष्ट करत पुढे काय करणार हे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या पडळकर यांच्या भूमिकेबाबत आपण जाणून घेऊ या.
गोपीचंद पडळकर म्हणाले, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला नाराजी वाटते का? भाजपने प्रथम मला विधान परिषद काम करण्याची संधी दिली. त्याचं मी सोनं केलं. यावेळी महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न विधान परिषदेमध्ये लावून धरले. विधान परिषदेच्या बाहेर रस्त्यावरची सुद्धा लढाई लढली. यंदा मला पक्षाने विधानसभेची जत म्हणून उमेदवारी दिली. येथील जनतेने मला चाळीस हजार मताधिक्याने निवडून दिले. आता मी नाराज असण्याचा प्रश्नच नाही. आम्ही ज्या लोकांसाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या, की मला मंत्री पद मिळावं. परंतु पक्षाने जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे.
आणखी वाचा-पवार गटाच्या आमदारांची अजितदादाशी भेट, मिटकरी म्हणाले “विरोधी बाकावर जीव रमत नसल्याने…”
मी इथून पुढे राज्यातील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, बहुजन समाज, ओबीसी, भटके विमुक्त समाजासाठी, हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी मी पूर्णवेळ काम करणार आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्न असणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक आहेत. धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावे आशा त्यांच्या भावना होत्या. परंतु पार्टीने विचार करूनच निर्णय घेतला असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण पार्टीच्या समाजकार्यात आधीही होतो. आजही आहे आणि उद्याही असणार आहे. तेव्हा देवाभाऊ, नरेंद्र मोदींसोबत कालही होतो आजही आहोत उद्याही असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपसोबत राहावे ही माझी विनंती आहे.