नागपूर : व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यातील सफारी आता मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील राहिली नाही. परंतु, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या रुपाने वाघ आणि बिबट्याचे सहज दर्शन त्यांना घेता येऊ लागले. मात्र, गेल्या एक ते दीड महिन्यांपासून या प्राणीसंग्रहालयात त्यांचेही दर्शन दुर्लभ झाल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जंगलातील व्याघ्रसफारीचा एका कुटुंबाचा खर्च हा पाच ते दहा हजारांवर गेला आहे. केवळ व्याघ्रदर्शनासाठी सर्वसामान्य कुटुंबाला ते परवडण्यासारखे नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या रुपाने त्यांना पर्याय मिळाला. मोकळ्या जागेत फिरणारे वाघ आणि बिबट्या त्यांना बंद वाहनातून सहज दिसू लागले. याशिवाय सफारीचा खर्चही आवाक्यातला असल्याने अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नागपुरातीलच नाही तर इतरही शहरांमधून आलेले नागरिक या प्राणीसंग्रहालयात सफारी केल्याशिवाय जात नाहीत. अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांची सहल येथे येते. मुलेही खुल्या वातावरणातील वाघ, बिबट्या पाहून आनंदी होतात.
हेही वाचा: वादळी हिवाळी अधिवेशनाची परंपरा यंदा कायम राहणार
प्राणीसंग्रहालयाच्या महसुलात देखील चांगली वाढ झाली. दरम्यानच्या काळात येथून बिबट्या अनेक दिवस बेपत्ता होण्याचे प्रकार घडले. कधी पिंजऱ्याच्या प्रवेशद्वारात प्राणी अडकल्याने व्यवस्थापन चांगलेच चर्चेत आले. आता गेल्या एक ते दीड महिन्यापासून येथे व्याघ्रदर्शनच होत नसल्याचे काही पर्यटकांनी सांगितले. वाघच नाही तर बिबट्याचे देखील दर्शन होत नसल्याची तक्रार त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील व्याघ्रसफारी कक्षात नव्याने एक रस्ता तयार करण्यात आला आहे. हा नियमित सफारीचा रस्ता नाही. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवारी प्राणीसंग्रहालयाला भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान येथे वाघ, बिबट्याचे दर्शन होत नसल्याने वनमंत्र्यांची नाराजी नको म्हणून तर हा रस्ता करण्यात आला नाही ना, असाही प्रश्न पर्यटकांनी उपस्थित केला आहे.