मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मिहान आणि गोरेवाडा हे उपराजधानीतील दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि या दोन्ही प्रकल्पांना दीड दशक लोटल्यानंतरही उद्घाटनाचा मुहूर्त काही लागायला तयार नाही. मात्र, नागपूरकर मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून अखेर गोरेवाडय़ाच्या एका टप्प्याचा मुहूर्त लागला.
गोरेवाडय़ातील बचाव केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या गुरुवारी, १६ डिसेंबरला करण्याचे निश्चित झाले असून वाघ, बिबटे, काळवीट, चितळ, सांबर, असे सारेच वन्यप्राणी बचाव केंद्राच्या उद्घाटनासाठी सज्ज झाले.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या विस्तारित बृहत आराखडय़ाला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) श्री भगवान यांनी वनखात्यात विविध ठिकाणी बंदिस्त असलेल्या वन्यप्राण्यांना बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यासंदर्भात आदेश काढले. उद्घाटनाचा मुहूर्त अचानक ठरल्याने लगबगीने वन्यप्राण्यांना आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. वनखात्यातील सर्वाधिक जखमी प्राण्यांना महाराजबाग प्राणीसंग्रहालयाने आश्रय दिला.
या प्राणीसंग्रहालयातील दोन वाघिणींना आज, सोमवारी गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात आले, तर चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना वनपरिक्षेत्रातील एक, मोहर्ली येथून चार, रामबाग नर्सरीतून दोन, अशा सात बिबटय़ांची रवानगी रविवारी रात्रीच करण्यात आली. याशिवाय, रामटेक येथील मृगविहारातील तीन नर काळवीट व चार मादी काळवीट, तीन नर चितळ आणि चार मादी चितळ, तीन नर सांबर व चार मादी सांबर यांना बचाव केंद्रात स्थानांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अमरावती जिल्ह्य़ातील वडाळी येथून दोन बिबटे येण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकूणच ऐनवेळेवर लग्न ठरल्यानंतर जशी घाईघाईने मिळेल त्या मार्गाने वऱ्हाडय़ांना निमंत्रित केले जाते, तसेच काहीसे गोरेवाडा बचाव केंद्राच्या उद्घाटनासाठी करण्यात आले आहे. या वन्यप्राण्यांना स्थानांतरित करण्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी करूनच कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच श्री भगवान यांनी काढले होते. मात्र, उद्घाटनाचा मुहूर्त ऐनवेळी ठरल्याने या वन्यप्राण्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी केली का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Story img Loader