उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लागेल, असे वाटत असताना पुन्हा तो लांबणीवर जाण्याचे संकेत आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची चमू येऊन गेल्यानंतर उद्घाटनाचा मार्ग सुकर झाल्याचे भासवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, या मार्गावरील अडथळे वाढतच आहेत.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची दोन सदस्यीय चमू जून महिन्यात निरीक्षणासाठी येऊन गेली. त्यावेळी त्यांनी प्राणिसंग्रहालयाच्या बृहत आराखडय़ात काही बदल सुचवत रात्री उशिरापर्यंत अहवाल तयार केला. या अहवालात नेमके काय दडले होते हे अद्यापपर्यंत बाहेर पडले नाही, पण महामंडळाकडून प्राणिसंग्रहालयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र रंगवण्यात आले. या बांधकामाच्या संदर्भातच त्यांनी काही सूचना केल्या. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मनोऱ्यांचे बांधकामही व्यवस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ओडिशाचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सरोज पटनाईक व आर्किटेक्ट रुमेल मेहता यांच्या चमुने बदलांसह नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महामंडळाला केल्या. ते बदलच अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाहीत.
दरम्यानच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकल्पाला भेट दिली आणि इंडियन सफारी प्राधान्याने सुरू करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठीचा प्रस्ताव त्वरित सादर करून निविदा काढा, असे निर्देशही त्यांनी महामंडळाचे संचालक ए.के. निगम यांना दिले. यावेळी निगम यांनी केलेल्या सादरीकरणावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. या सादरीकरणात कालबद्धता नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखण्यास सांगितले. प्रकल्प किती कालावधीत पूर्ण होईल याच आराखडा आधी पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वाहनांच्या निविदा, वन्यप्राणी कुठून व कसे आणणार यासंदर्भातला सविस्तर अहवाल वनमंत्र्यांनी सादर करण्यास सांगितले. मात्र, यातील बऱ्याचशा सूचना अजूनपर्यंत पूर्णत्वास आलेल्या नाहीत.
याशिवाय सुरक्षा भिंतीसह प्राणिसंग्रहालयातील इतरही बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे, पण बांधकाम खात्याकडून बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रसुद्धा मिळालेले नाही. त्यामुळे महामंडळाकडून गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन लवकरच करणार असल्याचे दिले जाणारे संकेत आता फोल ठरत असल्याचे चित्र आहे.