मासे खाल्ल्यामुळे आरोग्यावर परिणाम
गोसेखुर्द जलाशयातील विषारी पाण्यामुळे मासेही विषारी झाले आहेत. हे विषयुक्त मासे खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या जलाशयात अवैधरित्या चोरीने होणारी मासेमारी बंद करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाने केली आहे.
भंडारा व नागपूर जिल्ह्यच्या सीमेवर वैनगंगा नदीवर गोसेखुर्द जलाशय बांधण्यात आला आहे. या जलाशयाला नागपूर शहरातील नाग नदीचे प्रदूषित पाणी येऊन मिळते. नाग नदी ही संपूर्ण नागपूर शहरातील मलमूत्र घाणयुक्त प्रदूषित पाणी जलाशयात वाहून नेते. यामुळे जलाशयातील पाणी विषारी झाले आहे. या पाण्यातील मासोळी खाणे योग्य नाही. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वाद देखील सुरू होता. येथील प्रकल्पांना पर्यायी जलाशयात प्रकल्प सुरू करण्यासाठी मत्स्यव्यवसाय आयुक्तांसमोर २० जुलैला झालेल्या समितीत मान्यता दिली आहे. गोसेखुर्द जलाशयातील जस्त धातूबाबत विश्लेषण अहवाल प्राप्त करण्यासाठी सीआयएफई वर्सोवा मुंबई यांना कळवण्यात आले आहे. या जलाशयावर खासगी व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय मासेमार बांधवांना आणून दररोज दहा टन मासोळी पकडून नागपूर व लगतच्या बाजारपेठेत विक्री करतात. यातून राज्य शासनाला एक रुपयाचाही महसूल प्राप्त होत नाही. त्यामुळे अवैधरित्या चोरीने होणारी मासेमारी बंद करणे आवश्यक आहे, अशी मागणी संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.