अकोला : वाशीम जिल्ह्यात जलस्त्रोताचे प्रमाण अत्यल्प आहे. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नाही. परिस्थितीवर मात करून पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे आहे. यासाठी जलतारा योजना उपयुक्त ठरणार असून वाशीम जिल्ह्यामध्ये १० लाखापेक्षा जास्त शोषखड्डे निर्माण केली जाणार आहेत. जलतारा योजनेचे लोकचळवळी रुपांतर होण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी कृतिशील पुढाकार घेतला. जिल्ह्यातील लाडेगाव येथे जलसंवर्धनासाठी श्रमदान करण्यात आले. या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बैलगाडीतून शिवारात जात ग्रामस्थ महिलांसह श्रमदान करीत अनोखे रुप दिले.
जलतारा अभियानात गावांमधील तलाव, नदी आणि विहिरी यांची स्वच्छता आणि पुनर्बांधणी केली जात आहे. जलविपन्न भागांत पाण्याची उपलब्धता वाढवून स्थानिक समुदायाचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. शेती, पशुपालन आणि घरगुती वापरासाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी जलस्रोतांचा सुयोग्य व्यवस्थापन हेअभियानाचे मुख्य उद्देश आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी जलतारा उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी महिलांसोबत श्रमदान करून त्यांना प्रोत्साहन दिले. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावात जलतारा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
लाडेगाव ग्रामस्थांनी १३०० जलतारा खड्डे तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी झाल्यास गावाच्या जलसंधारण क्षमतेत मोठी वाढ होईल आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल. लाडेगावच्या ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल. महिलांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी झाला असून जलतारा अभियान ग्रामीण भागातील जलसंवर्धनासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.
दहा लाख जलतारा तयार झाले तर…
योजनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येऊन आर्थिक उत्पादनामध्ये सुद्धा भरभराट होईल. साधारणत: एक जलतारा एका पावसाळ्यात ३.६० लक्ष लिटर पाणी जमिनी मुरवू शकतो, त्यामुळे जर जिल्ह्यामध्ये दहा लाख जलतारा शोषखड्डे निर्माण झाल्यास एकबुर्जीसारख्या ३० धरणासारखी क्षमता वाढणार आहे. जलतारा योजना ही लोक चळवळ होण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कामाला लागले. जिल्हाधिकारी दररोज सकाळी ७ ते १० ग्रामस्थांसोबत श्रमदान करणार आहेत. ग्रामस्थांनी नियोजन केल्यास जिल्हाधिकारी प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.