अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदांपैकी ५० टक्क्यांची प्रकल्पग्रस्तांमधून पदभरती करण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गट क व ड संवर्गातील एकूण ६८० पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आज, १० मार्चपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली.
राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क आणि ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे त्याच कृषी विद्यापीठातील बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने परवानगी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्या प्रकल्पबाधित कुटुंबामधुन प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक १० मार्चला दुपारपासून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पदभरतीमध्ये प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार आहे. कृषी विद्यापीठात गट क ची कनिष्ठ संशोधन सहाय्यक ३०, कृषी सहाय्यक (पदवीधर) सात, कृषी सहाय्यक (पदविका) ३४ असे ७१ पदे, वरिष्ठ लिपिक पाच, शाखा सहायक ३९, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पाच, ग्रंथालय सहायक एक, वरिष्ठ यांत्रिक चार, कनिष्ठ यांत्रिक सहा, पंप परिचर दोन, वाहन चालक १८ असे ८०, प्रयोगशाळा परिचरचे एकूण ३९ पदे, परिचरची ८०, चौकीदारची ५० पदे, ग्रंथालय परिचरची ५ पदे, माळीचे आठ पदे, मत्ससहाय्यक एक पद, व्हॉलमनची दोन पदे व मजुरांची सर्वाधिक ३४४ पदे असे एकूण ६८० पदांसाठी मेगा पदभरती कृषी विद्यापीठात होणार आहे.
अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदत
विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाईल. प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आजपासून पुढील एक महिना गट क व ड संवर्गातील विविध पदांसाठी प्रकल्पग्रस्त पात्र उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे यांनी दिली.