नागपूरच्या  महालभागात १७ मार्चच्या रात्री उसळलेल्या दंगलीत झालेल्या हानीच्या नुकसान भरपाईपोटी शासनाने बुधवारी ७ लाख १५ हजार रुपयाची मदत मंजूर केली आहे. १७ तारखेला रात्री झालेल्या हिंसाचारात दंगलग्रस्त भागातील एक घर आणि दुचाकी ,चारचाकी व क्रेन जाळण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने याचे पंचनामे करून ७.१५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता, त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्याचा जी.आर.काढला आहे. त्यानुसार १३ दुचाकी, ३९ चारचाकी, दोन ऑटो, दोन दुकाने, एक घर आगीमुळे अंशता जळाले होते.

११ दुचाकी, ४० चारचाकी व दोन क्रेन पूर्णपणे जळाल्या होत्या. घरासाठी २० हजार रुपये, दोन दुकांनासाठी प्रत्येकी दहा  हजार प्रमाणे एकूण २० हजार, दोन ऑटोंना आठ हजार,अंशता व पूर्णता जळालेल्या एकूण  २४ वाहनांसाठी ५९ हजार आणि ४० चारचाकी वाहनांना ५० हजार अशी  एकूण ४ लाख ५० हजार रुपयांची अंशता मदत मंजूर करण्यात आली आहे.

उर्वरित २ लाख ६० हजार असे एकूण ७ लाख १५ हजार रुपये मदत करण्यात येणार आहे.शनिवारी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस नागपूरला आले होते. त्यांनी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दंगलीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला होता व लवकरच भरपाईची रक्कम दिली  जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दंगलीमध्ये जखमी एका व्यक्तीला पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.