नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील शासकीय ‘हत्ती कॅम्प’ सध्या बसंती, रूपा, अजित, मंगला, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी, कुसुम हे नऊ कार्यरत आहेत. मात्र, या नऊ हत्तींना येत्या २० जानेवारीपासून तर २९ जानेवारीपर्यंत रजेवर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे ‘हत्ती कॅम्प’ दहा दिवस बंद राहणार आहे. गडचिरोली वनवृत्तातील सिरोंचा वनविभागाअंतर्गत् कमलापूर वनपरिक्षेत्रात हा ‘हत्ती कॅम्प’ आहे. यात कार्यरत नऊ हत्तींना सुटीच्या कालावधीत ‘चोपिंग’ करण्यात येणार आहे.
हत्तींना ‘चोपिंग’ कशासाठी ?
वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशी सुट्टी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या दहा दिवसात त्यांच्या पायांना ‘चोपिंग’ औषधांचा शेक दिला जातो. ४०-४५ प्रकारच्या जडीबुटींपासून औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरड, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका ड्रममध्ये ‘चोपिंग’चा लेप तयार करतात. तो करून पहाटेला व सायंकाळी हत्तीचे पाय शेकतात.
हेही वाचा…‘समृद्धी’वर पुन्हा डुलकी ठरली घातक…कारची ट्रकला धडक; एक ठार, दोन जखमी…
अधिकारी काय म्हणतात ?
महाराष्ट्रातील हा एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापूर ‘हत्ती कॅम्प’ला अनेक पर्यटक येत असतात. मात्र, सध्या दहा दिवसासाठी कॅम्प बंद आहे, कारण हत्ती सध्या सुट्टीवर आहेत. दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना ‘चोपिंग’ केले जाते, असे कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी. झाडे म्हणाले.
वनरक्षकाचे म्हणणे काय ?
२० जानेवारीपासून ‘कॅम्प’ नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होणार आहे. सध्या थंडीची लाट सुरू असल्याने हत्तींच्या पायांना भेगा पडू नये म्हणून त्यांना आवश्यक असे ‘चोपिंग’ उपचार केले जात आहे, असे ‘हत्ती कॅम्प’चे प्रभारी वनरक्षक गुरुदास टेकाम म्हणाले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय सांगितले ?
दहा दिवस चालणाऱ्या या ‘चोपिंग’ प्रक्रियेमध्ये हत्तींची विशेष काळजी घेतली जाते. त्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केली जाते, असे कमलापूर येथील पशुवैद्यकीय वन्यजीव अधिकारी डॉ. महेश येमचे म्हणाले.
हेही वाचा…सेलिब्रिटींपासून सरपंचांपर्यत सर्वच, असूरक्षित, परिस्थिती हाताबाहेर -पटोले
मेळघाटातही हत्तींना रजा ?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलकास येथील हत्ती पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. १० ते २५ जानेवारी दरम्यान मेळघाटातील हे हत्ती पंधरा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. हत्ती सफारी अंतर्गत पर्यटकांच्या सेवेत राबणाऱ्या सुंदरमाला, चंपाकली, लक्ष्मी आणि जयश्री या हतींना ही पंधरा दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आल्यामुळे १५ दिवस पर्यटकांना मेळघाटात हत्ती सफारी बंद राहणार आहे. रजेवरील हत्ती २६ जानेवारीला कामावर परतणार आहेत. यामुळे २६ जानेवारीपासून हत्ती सफारी पूर्ववत सुरू होणार आहे.