संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमातील सूर
‘अच्छे दिन’ येणार असे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या केंद्र व राज्यातील सरकार सामान्य नागरिक व कर्मचाऱ्यांच्या मूळ प्रश्नावरून लक्ष इतरत्र वळविण्यासाठी डिजीटल इंडिया सारख्या घोषणा करीत आहे, यातून कर्मचारीही भरडला जात आहे. तो अच्छे दिन केव्हा येणार? याची वाट पाहात आहे. सरकार देशभरातील कर्मचाऱ्यांबाबत दडपशाहीचे धोरण अवलंबित आहे, असा आरोप कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय नेते सुकोमल सेन यांनी केला.
येथील धनवटे महाविद्यालयाच्या पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नागपूर शाखेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्मचारी संघटनेचे नेते र.ग. कर्णिक होते. व्यासपीठावर राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील जोशी, स्वागताध्यक्ष बबनराव तायवाडे, योगीराज खोंडे, अशोक दगडे, चंद्रहास सुटे, अशोक थुल, कृष्णराव बिरे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांची स्थिती सध्या वाईट असून त्यांच्यापुढे रोज नवनवी आव्हाने येत आहेत. त्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये एकजूट असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन नाही, महागाई भत्ता दिला जात नाही. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आहे. नागपूर ही समतेची भूमी आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मात्र, याच भूमीतून काही लोक विषमतेचेही बीज रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्मचारी व नागरिकांनी यापासून सावध राहावे व आपल्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करावा, असे आवाहन सेन यांनी केले.
यावेळी रा.ग. कर्णिक, बबनराव तायवाडे, अशोक थुल यांची भाषणे झाली. थुल यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढय़ाचा इतिहास सांगताना एकजूट महत्त्वाची असल्याचे पटवून दिले. महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग, कालबद्ध पदोन्नती, रिक्तपदांची भरती यासह राज्य कर्मचाऱ्यांच्या इतरही मागण्या मान्य करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संघर्षांसाठी तयार असावे, असे आवाहन यावेळी सर्व वक्तयांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तावक अशोक दगडे यांनी केले. त्यांनी नागपूर जिल्हा संघटनेचे विविध आंदोलनात महत्त्वाचे योगदान होते.अनेक महत्त्वपूर्ण निर्णय नागपुरातच झाल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून प्रतिनिधी आले होते. कार्यक्रमासाठी सतीश जोशी, गोपाल इटनकर, प्रमोद बेले, ईश्वर बुधे यांच्यासह जिल्हा शाखेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा