नागपूर: शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपात मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांनी उडी घेतली. त्यामुळे येथील नियोजित बहुतांश शस्त्रक्रिया स्थगित केल्या गेल्या. तर आता केवळ अत्यावश्यक शास्त्रक्रियाच होत आहे. येथे गंभीर वगळून इतर रुग्णांना दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा रुग्णांचा आरोप आहे.
हेही वाचा >>>नागपूर: ज्यांनी जंगल सांभाळले त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवले! विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेची खंत
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयांतील परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह वर्ग तीन व चारच्याही सगळ्याच कर्मचाऱ्यांचा सहभाग सकाळच्या पहिल्या पाळीत मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे येथील रुग्णसेवाच सलाईनवर आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतल्याचा दावा होत आहे. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार म्हणाले, सकाळी सर्व बाह्यारुग्णसेवा विभाग, आकस्मिक विभाग, प्रयोगशाळा सुरू आहेत. काही प्रमाणात नियोजित शस्त्रक्रिया स्थगित केल्या, पण सर्व आपत्कालीन शस्त्रक्रिया होत आहे. रुग्णांना कसलाही त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेतली गेली आहे. दरम्यान मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयांतील दोन हजारावर परिचारिका, तंत्रज्ञ स्वच्छता कर्मचारीही मोठ्या संख्येने संपात राहणार असल्याचा संघटनांचा दावा आहे. तर रुग्णांसाठी प्रशासनाने परिचारिका महाविद्यालयांतील विद्यार्थी, निवासी व आंतरवासिता डॉक्टरांसह इतरही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध वरडांमध्ये सेवा लावल्या आहेत.