यवतमाळ : राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य केल्या. निवडणुकीपूर्वी तर कर्मचाऱ्यांप्रती प्रचंड आस्था दाखवत मागण्या मान्य करण्याचा सपाटा लावला. अनेक मागण्या विधिमंडळ सभागृहात मान्य करण्यात आल्या. मात्र, यातील बहुतांश मागण्या या केवळ घोषणा ठरल्या असून, अद्याप कोणत्याही मागणीसंदर्भात शासन आदेश काढण्यात आला नाही. त्यामुळे सभागृहात मान्‍य केलेल्या मागण्यांची पूर्तता न केल्यास कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशाराच कर्मचारी संघटनांनी सरकारला दिला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारने सभागृहात मान्य केलेल्या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाभर दोन तास सत्याग्रह आंदोलन केले. राज्य समन्वय समितीने आज गुरूवारी संपूर्ण राज्यात हे धरणे आंदोलन आयोजित केले होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बोलताना संघटनेचे राज्यउपाध्यक्ष नंदकुमार बुटे यांनी, सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. सभागृहात मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता न केल्यास राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

आजचे हे राज्यव्यापी आंदोलन निवृत्ती योजना, रिक्त पद भरती, पीएफ, आरडीए कायदा रद्द करणे, खुल्लर समितीचा अहवाल प्रसिध्द करणे, कंत्राटी  कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करणे, सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करणे, कर्मचाऱ्यांवरील हिंसक हल्ल्यांबाबत विशेष कायदा लागू करणे, वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंदी उठविणे अशा विविध मागण्यांसाठी करण्यात आले. आजच्या या आंदोलनात भविष्यातील बेमुदत आंदोलनाचे बीजारोपण होत असल्याचे मत कर्मचारी नेते व समन्वय समितीचे निमंत्रक डॉ रवींद्र देशमुख यांनी व्यक्त केले. सभागृहात घोषणा करुनही सरकार मागण्यांच्या संदर्भात शासन निर्णय काढत नाही, हा सभागृहाचा अपमान असून सर्व सामान्य व संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार असल्याचे रवींद्र देशमुख म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश वैद्य, आशिष जयसिंगपुरे, शोभा खडसे यांनी शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी विविध कार्यालयीन कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी किशोर पोहनकर, अरविंद देशमुख, एम.डी.धनरे, दिवाकर नागपूरे, रवी चव्हाण, विनोद उन्हाळे, नरेद्र राऊत, अजय मिश्रा, नंदा साबळे, छाया मोरे, शाम मॅडमवार, गोपाल गायकवाड, गोपाल शेलोकार, मनिषा चव्हाण, देवांगणा मेश्राम  आदी सहभागी झाले होते.