नागपूर : सरकारने जुनी पेन्शन लागू न केल्यास १४ डिसेंबरपासून सरकारी- निमसरकारी कर्मचारी कामबंद करतील, असा इशारा आमदार किरण सरनाईक यांनी दिला. नागपुरातील विधानभवन परिसरात प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते.
किरण सरनाईक म्हणाले, जुनी पेन्शनसंदर्भात १५ डिसेंबर २०२० रोजी मी सभागृहात प्रश्न मांडला होता. तेव्हापासून या विषयावर सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आलो आहे. आज यासंदर्भात विधानभवनावर सरकारी-निमसरकारी कर्मचारी मोर्चा घेऊन आले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तीनसदस्यीय समिती नेमली होती. समितीचा अहवाल २० नोव्हेंबरला आला. पण, तो अहवाल सरकारने जाहीर केलेला नाही. सरकारने जुनी पेन्शन लागू न केल्यास १४ डिसेंबरपासून सरकारी- निमसरकारी कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असेही सरनाईक म्हणाले.