मान्यता रद्द करण्याच्या निर्णयावर शंका
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या जागेवर अनेकांचा डोळा आहे. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात आणि विद्यमान भाजप-सेना सरकारच्या कार्यकाळातही ही जागा घेण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे तर हे प्राणिसंग्रहालय बंद करण्यासाठी डाव रचण्यात आला नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
महाराजबाग प्राणिसंग्रहालय शहराच्या मध्यवर्ती सीताबर्डीजवळ आहे. शहरातून ते हलवण्यासाठी अनेक प्रयत्न यापूर्वीही झाले होते. काँग्रेसच्या कार्यकाळात याठिकाणी बुद्धिस्ट कन्वेन्शन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली होती. विद्यमान सरकारने विकासाचे नाव पुढे करून ही जमीन संपादित करण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात ते समायोजन करण्याचा विचार विद्यमान सरकारने पुढे केला. मात्र वेळोवेळी नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून याला कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला. मात्र, विकास कामांसाठी कृषी विद्यापीठाच्या अखत्यारितील जागा हळूहळू घेण्यास सुरुवात झाली. शहराच्या विकासात हे प्राणिसंग्रहालय अडथळा ठरत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. कृषी विद्यापीठाचा विरोध झुगारून त्यांची जमीन घेण्याचे प्रयत्न सुरू झाले.
मूळात प्राणिसंग्रहालय चालवणे हे कृषी विद्यापीठाचे काम नाही. राज्यातील प्राणिसंग्रहालय एकतर वनखाते किंवा महापालिकेच्या अखत्यारित आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा महसूल गेल्या काही वर्षांत ३५ लाख रुपयांवरून चार कोटी रुपयांवर गेला होता. तरीही प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राधिकरणाने सुचवलेल्या दुरुस्त्यांकडे कानाडोळा केला. प्रशासनाने मनात आणले असते तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेले हे लहानसे प्राणिसंग्रहालय चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकले असते. मात्र, प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या उदासीनतेमागे आणखी काही कारण तर नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे वैदर्भीय प्रेक्षकांचे कमी वेळेत कमी खर्चात असलेले पर्यटन मात्र त्यांच्यापासून हिरावले जाणार आहे.
प्राणिसंग्रहालय दृष्टीक्षेप
* काही वर्षांपूर्वी या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या बछडय़ांच्या पिंजऱ्यात जिल्ह्यचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेला प्रवेश आणि छायाचित्रण चांगलेच गाजले होते.
* दिल्लीहून विमानाने दुसऱ्या वाघाचे रक्त आणून प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला ते देण्याचा भारतातील पहिला प्रयोग महाराजबाग प्राणिसंग्रहालयातच झाला होता.
* वन्यप्राणी दत्तक देण्याची प्रक्रिया याच प्राणिसंग्रहालयातून सुरू झाली आणि अभिनेता टायगर श्रॉफ याने एक वर्षांकरिता वाघाला दत्तक घेतले.
* वनखात्याकडे जखमी प्राण्यांना ठेवण्याची व्यवस्था नसताना याच प्राणिसंग्रहालयाने त्यांना आधार दिला आहे.
* विद्यार्थ्यांच्या अनेक छोटय़ामोठय़ा सहली महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने अनुभवल्या आहेत.