डाव्या कालव्याचे काम अजूनही अपूर्ण
राज्य सरकारने गोसेखुर्द प्रकल्पाचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र वर्षभरापूर्वी उच्च न्यायालयात सादर केले असले तरी या धरणाच्या डाव्या कालव्यात अजूनही मुरुमाचा भराव टाकण्याचे काम सुरू असून अधिकाऱ्यांनी हे पूर्ण करण्यासाठी २०२० उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे राज्य सरकारला उच्च न्यायालयात सादर केलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य नाही.
गोसेखुर्द प्रकल्पाचे काम सुरू होऊन ३० वर्षांचा काळ लोटला तरी अजूनही डाव्या कालव्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप आणि त्यासंदभातील जनहित याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर घोटाळा प्रकरणाची लाचलुचत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे सरकारने हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार, असे प्रतिज्ञापत्र वर्षभरापूर्वी न्यायालयात सादर केले, परंतु प्रत्यक्षात स्थिती काही वेगळीच आहे. डाव्या कालव्याचे अधीक्षक अभियंता यांनी मुख्य कालव्याचे काम २०२० मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
डाव्या कालव्याचे काम दोन कंत्राटारांना विभागून दिले आहे. पहिल्या १० किमीचे काम श्रीनिवासन यांच्याकडे आणि ११ ते २३ किमीचे काम एम.जी. भांगडिया यांच्याकडे आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाले होते. त्यामुळे पुन्हा त्यांना काम करायचे आहेत, परंतु गेल्या चार वर्षांपासून कालव्याचे काम पूर्ण करू शकले नाही.
आता आणखी नवनवीन बाबी पुढे करण्यात येऊ लागल्या आहेत. एवढे झाले आणि आता मातीचा प्रकार आणि त्यावर काम करण्यासाठी तज्ज्ञांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. वास्तविक काम सुरू होण्यापूर्वी या सर्व गोष्टी करायच्या असतात. २००९ मध्ये अस्तरीकरण झाले होते. त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आले आणि कंत्राटदाराला पुन्हा ते काम करावयाचे आहे, परंतु आता सहा महिन्यांपूर्वी आयआयटी गांधीनगरचे मत मागवण्यात आले. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. शिवाय उपकालवे आणि पाटसऱ्याकरिता अजूनही भूसंपादन होणे शिल्लक आहे. १२.७० हेक्टर जमीन हवी आहे. त्यापैकी ८.८६ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. गोसे (बु) आणि आकोट उपसासिंचन प्रकल्पाचे काम होणे आहे.
मुख्य कालव्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले नाही तर ऑक्टोबर २०१७ मध्ये नवीन निविदा काढण्यात येतील. कंत्राटदाराची सुरक्षा ठेव आणि बँक हमी रकमेतून ही कामे केली जातील. डावा कालवा २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे डावा कालव्याचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी आणि आताची स्थिती
जनमंचने २८ जून २०१५ ला डाव्या कालव्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सिंचन शोध यात्रा काढली होती. त्यावेळी कालव्यात बाभळीचे झाडे वाढली होती. त्यामुळे हा कालावा आहे की बाभळीचे जंगल, अशी अवस्था होती. आता (१५ जुलै २०१७) दोन वर्षांनी पुन्हा या कालव्याच्या कामातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी यात्रा काढली. त्यात धक्कादायक बाब समोर आली. २२.९३ किमीच्या कालव्याची दोन वर्षांत केवळ दीड किमी कालव्यावर सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. अजूनही मुरुमाचा भराव टाकण्यात येत आहे. तसेच कालव्यात वाढलेली झाडे तोडण्यात आली आहेत. मरुमाचा भराव टाकून त्यावरून थोडय़ाफार प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.
आनंद आणि शंका
भंडारा जिल्हा, लाखांदूर तालुक्यातील बेलाटी गावकऱ्यांमध्ये पाणी सोडत असल्याचा आनंद तसेच पाणी नियमित सोडण्यात येईल याबाबतची शंका, अशा दोन्ही बाबी दिसून येत आहेत. २००७ पासून कालव्याचे काम सुरू झाले असून कालवा पूर्ण झालेला नाही, परंतु मागील हंगामात थोडय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात आले. तसेच नेरला उपसासिंचन प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे उपकालव्यात पाणी दिसू लागले आणि विहिरींची जलपातळी वाढली. भूजलपातळी वाढली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. अनेक वर्षांनंतर पाणी सोडण्यात आले. चाचणीनंतर नेरला येथून पाणी सोडणे बंद केले. यामुळे नियमित पाणी सोडण्यात येईल की नाही, याबाबत बेलाटी गावकऱ्यांमध्ये शंका आहे. कार्यकारी अधिकारी प्रवीण झोड यांनी नियमित पाणी सोडण्यात येईल, असे गावकऱ्यांना सांगितले.
गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधकामात दोन वर्षांत काहीही प्रगती नाही. अजूनही मरुमाचा भराव टाकण्यात येत आहे. सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरणाचे (लाईनिंग) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे प्रकरण न्यायालयात असून देखील दोन्ही कंत्राटदार कामात दिरंगाई करीत आहे. सरकारने त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. कंत्राटदारांना भीती अजिबात नाही.’
अॅड. अनिल किलोर, अध्यक्ष जनमंच
पाण्याची दरुगधी
गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याला येथून पाणी सोडण्यात येते, त्या डाव्या सिंचन विमोचक केंद्रात गटारच्या पाण्याची दरुगधी येत आहे. नागपूर शहरातील सांडपाणी नागनदीत सोडण्यात आहे. पुढे सांडपाणी गोसेखुर्द धरणात जाते. त्यामुळे वैनगंगा नदीवर या धरणाचे पाणी दूषित झाले असून पाण्याचा रंग काळा आणि दरुगधी येत आहे. तेव्हा वैनगंगेचे पाणी आता शुद्ध राहिले असून गटारगंगा झाली आहे.