नागपूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नागपुरात प्रथमच होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टी, पूरस्थितीसह विदर्भातील प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत देऊन अधिवेशनाचा रोख राजकीय चर्चेवर केंद्रित करून टाकला आहे. हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवरही चर्चा होते. त्यामुळेच अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी सर्वपक्षीय वैदर्भीय आमदार करतात. त्याला भाजपही अपवाद नाही.

ठाकरे सरकारच्या काळात करोनामुळे दोन वर्षे अधिवेशन नागपुरात झाले नाही. त्यामुळे यावर्षीच्या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिसेंबर १५ पासून नागपुरात अधिवेशन सुरू होण्याचे नियोजन आहे. यात अतिवृष्टी, परतीच्या पाऊस, पूरस्थिती, झालेली पीक हानी. मदतीपासून वंचित शेतकरी, ओल्या दृष्काळाची मागणी ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे बिघडलेले नियोजन, नोकर भरती, विकास कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी झालेला विलंब, रखडलेले प्रकल्प, धान खरेदी यासह विदर्भाशी निगडीत इतरही मुद्यांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता होती. मात्र दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे संकेत दिल्याने अधिवेशनाचा रोख विदर्भाच्या प्रश्नावरून मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने होणाऱ्या राजकीय चर्चेकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा :बुलढाणा: सरकारच्या धोरणांविरोधात चिखलीत काँग्रेसचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन

राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह २० सदस्य आहेत. त्यात विदर्भातील तिघांचा समावेश आहे. ठाकरे मंत्रिमंडळात विदर्भातून सात मंत्री होते. त्यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये ही संख्या दहा होती. सध्याचे विदर्भाचे प्रतिनिधित्व (३) लक्षात घेतले तर त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे गट व भाजपचा वाटा किती हा मुद्दा आहेच. लाल दिव्याची गाडी कोणाला मिळणार याची चर्चा पुढच्या काळात विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार आहे. यातच बच्चू कड पुन्हा मंत्री होणार की रवी राणांना संधी मिळणार हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांना शह देण्यासाठी फडणवीस समर्थक परिणय फुके पुन्हा मंत्री होतात की भंडारा-गोंदियातून नवा चेहरा येणार, याकडेही लक्ष लागले आहे. नागपुरातून फडणवीस यांच्या निमित्ताने जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यांच्या शिवाय प्रवीण दटके, कृष्णा खोपडे व शिंदे गटातील एकमेव आमदार आशीष जयस्वाल हे सुद्धा स्पर्धेत आहेत. या तर्कवितर्कांमध्ये अधिवेशनात चर्चेला येणारे विदर्भातील प्रश्न मागे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :गडचिरोली : सूरजागड लोहखनिजाविषयी होणाऱ्या जनसुनावणीसाठी प्रशासनाचे दबावतंत्र!

विदर्भाकडे दुर्लक्षाची शक्यताच नाही

मंत्रिमंडळ विस्तार व अधिवेशनात चर्चेला येणारे मुद्दे या भिन्न बाबी आहेत. उलट मंत्र्यांची संख्या वाढल्याने निर्णय गतीने होतील. फडणवीस उपमुख्यमंत्री असल्याने विदर्भाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यताच नाही. – गिरीश व्यास, प्रवक्ते, भाजप.

सरकारला विस्ताराची घाई

मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वळवणे हे भाजपचे कामच आहे. ओल्या दृष्काळाच्या मागणीबाबत अद्याप सहकारने काहीच केले नाही. विदर्भात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अनेकांना मदत मिळाली नाही. याकडे लक्ष देण्याऐवजी सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराची घाई झाली आहे. – संदेश सिंगलकर, प्रदेश सचिव, काँग्रेस.

Story img Loader