विधानभवनावर अकरा संघटनांचे मोर्चे

शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्थानिक पोलिसांच्या कुटुंबीयांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून पोलिसांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. या मोर्चात अनेक पोलिसांच्या पत्नी आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे त्यांनी पोलिसांच्या मागण्याची दखल घ्यावी, अशी विनंती केली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी अकरा संघटनांचे मोर्चे निघाले. यावेळी मातंग समाजाचा मोर्चा निघाला असताना त्यांच्यावर लाठीमार झाल्याचे कळताच अन्य मोर्चातील मोर्चेकऱ्यांनी हा सरकारच्या विरोध असंतोष असल्याची प्रतिक्रिया दिली. ज्यांच्या खांद्यावर सुरक्षिततेची जबाबदारी आहे, त्यांचे कुटुंबीय असुरक्षित आहेत. पोलिसांच्या कुटुंबीयांनी राष्ट्र निर्माण संघटन नावाची संस्था स्थापन केली असून त्या संघटनेच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेचे नीलेश नागोलकर म्हणाले, समाजाला पोलिसांची नितांत गरज आहे पण त्यांचे सुख-दुख आणि समस्या कोणीच जाणून घेण्यास तयार नाही. त्यांचे प्रश्न सोडवायला आमदार, खासदार मंत्री स्वेच्छेने समोर येत नाही. सेवा आणि संरक्षण सर्वाना हवे, पण त्यांचे दुख व यातना मांडायला कोणी तयार नाही, अशी खंत पोलिसांच्या अनेक कुटुंबीयांनी व्यक्त केली. आमची घरे आज खराब झाली आहेत. मुलांच्या शिक्षणाची समस्या आहे. अनुकंपा तत्त्वावर पोलिसांच्या मुलांना घेतले जात नाही अशा अनेक समस्या आहेत. यावेळी विजय मारोडकर, निलेश नागोलकर, प्रशांत भारती, ओम जयस्वाल, मिलिंद सोनोने, अनिल शाह, वैशाली सोनुने, शारदा सूर्यवंशी, मीनाक्षी सुरकर, सीमा मालोंदे, उषा कळसकर आदी पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते.

 

Story img Loader