नागपूर : शासनाने आता तपास अधिकाऱ्यांसह सराफा व्यावसायिकांसाठी सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांना सराफा व्यावसायिकांकडील नोंदवहीत त्यांच्या दुकानात जाण्याचे प्रयोजन तसेच तपासाधीन गुन्हाबाबतची माहिती नोंदवून स्वाक्षरी करावी लागणार आहे. या नवीन निर्णयामुळे चौकशीच्या नावाने होणारा सराफांचा छळ थांबण्याची शक्यता आहे.
शासन निर्णयानुसार, चोरीच्या गुन्हातील आरोपीला अटक केल्यावर पंचासमक्ष चोरीच्या मुद्देमालाबद्दल सविस्तर चौकशी करणे, प्रथम खबर अहवालात चोरीच्या दागिन्यांचे वर्णन, कर्तव्यावरील पोलीस अंमलदाराखेरीज इतरांना कारवाईत न ठेवणे, कार्यक्षेत्राबाहेरील तपासासाठी सराफाकडे थेट न जाता प्रथम पोलीस अधीक्षकांनी नेमलेल्या दक्षता समितीच्या निदर्शनात आणूनच कारवाई करावी लागेल.
हेही वाचा…आज नागपूरसह भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा
चोरीचा माल हस्तगत करायला जाण्यापूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला संबंधित पोलीस आयुक्त तसेच जिल्हाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रथम अवगत करावे लागेल. सराफा दुकानात प्रवेशानंतर गुन्ह्याचा प्रथम खबर अहवाल- गुन्ह्याशी संबंधित माहिती व्यावसायिकाला द्यावी लागेल. त्यामुळे व्यावसायिकांना त्यांचे अभिलेख पडताळून सविस्तर माहिती देता येईल. व्यावसायिकांचा जबाब शक्यतो दुकानातच नोंदवावा, त्यांना पोलीस पथकासमवेत येण्याची जबरदस्ती करू नये. गुन्ह्यात सराफा व्यावसायिकाच्या सहभागाच्या खात्रीसाठी परिपूर्ण प्राथमिक चौकशी करावी.
पुरावा उपलब्ध झाल्यावर अटक करावी. पोलिसांनी पंचनामा करून सनदशीर मार्गाने जागेची झडती घ्यावी. शक्यतो मुद्देमालासंबंधीची कागदपत्रे जागेवर पडताळून फक्त मूळ कागदपत्रे पुरावा म्हणून जप्त करावी, सराफा व्यवसायिकांच्या संघटनेने प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना किंवा दोन स्थानिक साक्षीदारांना झडतीदरम्यान हजर ठेवावे. व्यावसायिकाकडे चोरीचा मुद्देमाल आढळल्यास पंचासमक्ष तो जप्त करावा व जप्तीची प्रत सराफा व्यावसायिकास देऊन त्याची स्वाक्षरी घ्यावी, असेही या निर्णयात नमूद आहे.
हेही वाचा…नागपूर- रामटेक लोकसभा मतदारसंघात ४२ लाखावर मतदार, साडेचार हजार मतदानकेंद्र
व्यावसायिकांसाठी महत्वाचे…
सोन्या- चांदीचे व्यापार करणारे, गहान ठेवणारे, सुवर्णकार व त्यासंबंधाने काम करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक माहिती (नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक) संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी लागेल. दागिने गहान ठेवणाऱ्या ग्राहकाकडून अधिकृत ओळखपत्राची छायांकित प्रत घेत स्वतंत्र नोंदवहीत नोंद करावी. संशयित गुन्हेगार सोन्या- चांदीच्या दागीने वस्तू विक्रीला आल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने दुकान परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा स्थापीत करावी. पोलिसांनी गुन्हाशी संबंधित प्रकरणाची विचारणा केल्यास पाच दिवसांत खुलासा करावा. चोरीचा माल ज्या सराफाकडे विकला आहे, त्याचे नाव जबाबात नोंदविल्यास माल हस्तगत करतांना संबंधित व्यापारी-कर्मचारी, संबंधित सराफा असोसिएशनने पोलिसांना सहकार्य करावे, असेही या निर्णयात आहे.
राज्य व जिल्हास्तरावर दक्षता समिती
“सराफा व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता पोलीस महासंचालक कार्यालयाच्या स्तरावर राज्यस्तरीय आणि पोलीस आयुक्तालय व जिल्हास्तरावर ‘दक्षता समिती’ स्थापन केली जाईल. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाने राज्यातील सराफा व्यावसायिकांचा चौकशीदरम्यानचा त्रास कमी होईल.”- राजेश रोकडे, उपाध्यक्ष, ऑल इंडिया जेम ॲन्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी).