लोकसत्ता टीम

अमरावती : कविवर्य सुरेश भट यांना जाऊन २२ वर्षे झाली आहेत. पण, त्यांच्या कविता, गाणी, शायरी, गझल आणि विविध आठवणींचा दरवळ अजूनही आसमंतात तितकाच ताजा आहे. प्रत्येक गाण्याच्या मैफलीत सुरेश भटांची एकतरी कविता, गीत किंवा नामोल्लेख हा असतोच. मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवणारे सुरेश भट गझलांच्या मैफलींमध्ये आजही तरुण आहेत.

नामवंत गायकांच्या आवाजाच्या रुपाने सुरेश भट यांच्या गझला व कविता आजही तशाच टवटवीत आहेत. ‘आज गोकुळात रंग’, ‘आताच अमृताची बरसून’, ‘गे मायभू तुझे मी’, ‘चल उठ रे मुकुंदा’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’ अशा अनेक गीतांच्या माध्यमातून अजूनही तरुण असलेले सुरेश भट यांचे जन्मगाव अमरावती. भट यांच्या या जन्मभूमीत त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, ही येथील साहित्यिकांची अपेक्षा. गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकाच्या उभारणीची मागणी केली जात आहे, पण सरकार स्मारकाच्या उभारणीसाठी सकारात्मक नाही, अशी खंत साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

कवी विष्णू सोळंके म्हणतात, आपण स्मारकाच्या उभारणीसाठी १८ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केले. यावर अमरावती जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, कलावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. शासनाने या बाबतीत मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही, हेच खरे दुःख आहे. शहरात केवळ उंची इमारती झाल्या म्हणजे ते गाव सांस्कृतिक ऐतिहासिक उंची गाठत नाही, असे मला वाटते. त्या गावात किती साहित्यिक कलावंत आहेत. ही खरी सामाजिक व सांस्कृतिक ऐतिहासिक उंची असते.

अमरावती जिल्ह्यातील सुरेश भट व मधुकर केचे यांचे स्मारक अमरावती येथे झाले पाहिजे, तसेच उद्धव शेळके यांचे स्मारक हे तळेगाव ठाकूर येथे म्हणजे त्यांच्या जन्मगावी व्हावे, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा लेखी स्वरूपात निवेदन पाठविले आहे. पण, त्याची अजूनही दखल घेतली गेली नाही. कोणत्याही सरकारला साहित्यिक, कलावंत यांची काही किंमत असते असे मला वाटत नाही, ही खंत विष्णू सोळंके यांनी व्यक्त करताना याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.