वाशीम : मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने नव्याने चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतर ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत चिवरा परिसरातील ग्रामस्थ, विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेत अकोला नांदेड महामार्ग रोखून धरला. यावेळी भाजपा आमदाराचा निषेध करण्यात आला.
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या २८ जून रोजीच्या बैठकीत जिल्ह्यातील चिवरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच ४३० खाटांचे सोईसुविधायुक्त रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. चिवरा येथील ७७ एकर ‘ई-क्लास’ शेतजमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित होते. १०० विद्यार्थी क्षमतेचे, ४८५ कोटींचा निधी खर्चून वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा करण्यात आली. ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. परंतु माशी कुठे शिंकली, कुणास ठाऊक, जिल्हा प्रशासनाने सदर महाविद्यालयासाठी पर्यायी चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले.
हेही वाचा – ‘पावसाक्षरं’मध्ये सजली पावसाची विविध रूपे
जिल्ह्यातील एक भाजपा आमदार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतरत्र पळवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या जागेला भाव मिळावा, म्हणून हा संपूर्ण खटाटोप सुरू असल्याचा आरोप स्वाभीमानीचे नेते दामू इंगोले यांनी केला आहे. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आक्रमक आंदोलनकर्त्यांनी अकोला-नांदेड महामार्ग रोखून धरला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यापूर्वी आमदार अमित झनक यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन चिवरा येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावे, अशी मागणी केली होती. अशातच तालुक्यातील विविध सामाजिक-राजकीय संघटना व ग्रामस्थ आक्रमक झाल्याने भविष्यात हा वाद वाढण्याची चिन्हे आहे.