वर्धा : काँग्रेसचे दिवस बरे नाही, असे आता म्हटल्या जाते. पक्षाचे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पानिपत झाले. तेव्हापासून सगळे कसे शांत शांत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर हे अनेक वर्षांपासून या पदाची जबाबदारी सांभाळत आहे. एक भला माणूस म्हणून त्यांची काँग्रेसमध्येच  नव्हे तर सर्वपक्षीय ओळख आहे. गावातील शेती सांभाळून पक्षाचे कामकाज सांभाळणाऱ्या चांदुरकर यांना चटका बसणार.

झाले असे की काँग्रेसचे कार्यालय असलेल्या सदभावना भवनात काही गाळे भाड्याने दिले आहे. तर वास्तूच्या मागील भागात मोकळी जागा आहे. याच मोकळ्या जागेत झुणका भाकर केंद्र सूरू होत आहे. हे केंद्र जिल्हाध्यक्ष चांदुरकर यांनी एका व्यक्तीस चालविण्यास  दिले. त्यावर चांदुरकर विरोधी समजल्या जाणाऱ्या शेंडे गटाचे शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे, माजी प्रदेश पदाधिकारी प्रवीण हिवरे तसेच यांनी आक्षेप घेतले.

त्यांच्या मते ही जागा पार्किंग व पक्षाच्या अन्य कामासाठी आहे. शासनाने ही जागा वास्तू बांधण्यास व पार्किंग साठी दिली होती. त्यामुळे खाजगी व्यवसाय कसा होवू शकतो, असा प्रश्न करीत या नेत्यांनी केंद्रासाठी शेड उभारण्याच्या बांधकामावर आक्षेप नोंदविले तशी तक्रार वर्धा नगर परिषदेस दिली.

आज यावर पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जागेची पाहणी केल्यावर लोखंडी शेड दिसून आले. पालिकेची कोणतीच परवानगी नं घेता हे काम झाले आहे. म्हणून आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई कां करण्यात येवू नये, अशी नोटीस बजावून  खुलासा करण्याची सूचना मनोज चांदुरकर यांना केली. त्यामुळे या जागा भाड्याने देण्याची बाब दोन गटातील छुपे युद्ध म्हणून चर्चेत आली आहे.

जिल्हाध्यक्ष चांदुरकर म्हणाले की यासाठी आम्ही परवानगी अर्ज दिला आहे. तो मंजूर होईल. मुळात काँग्रेस कार्यालयाचे काम कसे करावे, हा प्रश्न आहे. कारण पैसे नाही. कर थकीत असल्याने आलेले पैसे पालिकेत भरले. ही मोकळी जागा गलिच्छ व उपद्रवी लोकांचा अड्डा झाली होती. म्हणून उपयोगात असल्यास पैसे मिळतील व स्वच्छता पण राहील, असा हेतू.

तसेच पुढील काही भाड्यापोटी येणाऱ्या पैश्यातून कर व अन्य खर्च भागणार, असा विचार आहे. आता तक्रार झाली तर त्याचा खुलासा करू, अशी भूमिका चांदुरकर यांनी मांडली.

Story img Loader