गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेऊन नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडा व मुख्य प्रवाहात या, असे आवाहन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली येथे पोलीस मुख्यालयावरील एकलव्य हॉलमध्ये २२ जून रोजी सायंकाळी आत्मसमर्पित नक्षली कुटुंबांचा मेळावा व संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी जहाल माओवादी नेता गिरीधर तुमरेटी उर्फ गिरीधर व त्याची पत्नी संगीता या दाम्पत्याने आत्मसमर्पण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी नक्षलवादी चळवळीच्या हिंसक कारवायांमुळे अनेकांचे आयुष्य देशोधडीला लागले. त्यामुळे हिंसेची वाट सोडून अनेक जण सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करुन योजनांचा लाभ घेत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा…बुलढाणा जिल्ह्यातील जिगावमधून अकोल्यासाठी पाणी आरक्षित

शासनाने सन २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेसह विविध कल्याणकारी योजनांमुळे माओवादी चळवळीचे कंबरडे मोडत आहे. नक्षलवाद संपुष्टात येण्याचेच हे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. अतिशय कठीण परिस्थितीत जवान घनदाट जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवितात, त्यांच्या कार्याचाही यावेळी फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख करत प्रोत्साहन दिले. पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मनोगत व्यक्त केले

आतापर्यंत ६६४ जण नक्षली चळवळीतून बाहेर

आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांसह एकूण ६६४ माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. चार वर्षांत जिल्ह्यातून एकही युवक किंवा युवती या हिंसक चळवळीशी जोडलेली नाही. पोलिस भरतीत स्थानिकांना प्राधान्य असून पोलिस चालक शिपाई पदाच्या १० जागांसाठी २२५८ तर पोलिस शिपाई पदाच्या ९२८ जागांकरता २४ हजार ५७० उमेदवारांनी अर्ज केले. त्यामुळे पोलिस दलावरील युवकांचा विश्वास वाढत असल्याचे स्पष्ट होते, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

हेही वाचा…‘जीपीएस कनेक्ट’च्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी, जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर; जाणून घ्या फायदे…

नक्षलविरोधी अभियानचा आढावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सीटीसी किटाळी येथे भेट देऊन प्रशिक्षण व नक्षलवादविरोधी अभियानाबातचा आढावा घेतला . त्यांच्या हस्ते किटाळी येथील कॉन्फरन्स हॉल व महिला अंमलदार बॅरेकचे उद्घाटन झाले. यावेळी कमांडोंनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या अभियानातील क्षमतेचे प्रात्यक्षिक सादर केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government schemes offer rehabilitation path for naxalites urges deputy cm devendra fadnavis ssp 89 psg