तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे शक्य आहे. विभागातील गडचिरोली, भंडारा या दुर्गम जिल्ह्यांत तंत्रज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या विजयालक्ष्मी यांची नागपूर विभागीय आयुक्तपदी शुक्रवारी नियुक्ती झाली. शनिवारी त्यांनी त्याच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक म्हणून काम केले आहे. या दरम्यान तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजना राबवण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यानी स्वत: कॉम्युटर सायन्समध्ये पदवीप्राप्त केली आहे. दुर्गम जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी योजना राबवणे शक्य आहे. गडचिरोली, भंडारा यासारख्या जिल्ह्यांतही तंत्रज्ञान पोहचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ई पीक पाहणी,रोव्हरच्या माध्यमातून भूमापन सुरू आहे. तंत्रज्ञान निर्माण करणेच नाही तर सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम नागपूर विभागात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजयालक्ष्मी या मुळच्या आसाम कॅडरच्या अधिकारी आहेत. नंतर त्यानंतर त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले. त्यांना मराठीसह सात भाषा येतात.