कोणत्याही विचारसरणीच्या तळाची अर्थविषयक जाणीव हा महत्त्वाचा गाभा असतो आणि त्यासाठी कल्पनांची झेप आवश्यक असते, असे प्रतिपादन लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी येथे केले.
लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे संचालित एकलव्य एकल विद्यालय या एक शिक्षकी शाळेतील शिक्षक व पर्यवेक्षकांच्या चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप रविवारी येथील रेशीमबाग मैदानावरील स्मृती भवनात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री प्रीती झिंटा आणि संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.
कुबेर म्हणाले, आपल्या देशात दरवर्षी १ कोटी १० लाख विद्यार्थी पदवी प्राप्त करतात. त्यांच्या रोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना रोजगार द्यायचा असेल तर दर महिन्याला १० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. त्यासाठी अर्थविषयक जाणीव महत्त्वाची आहे. जगातील आघाडीच्या तीन कंपन्यांची ताकद भारताच्या समस्त उद्योगाच्या दुप्पट आहे, अशा बलाढय़ कंपन्या फेसबुक, अमेझॉन आणि गुगल यांचा विस्तार केवळ कल्पनाशक्तीवर झाला आहे. त्यासाठी अधिक भांडवलाची आवश्यकता नव्हतीच. धर्म, संस्कृती सर्व काही ठीक आहे. पण, अर्थविषयक जाणीव हे खरे वास्तव आहे. वास्तवाचा आधार नसलेली संस्कृती, भाषा, संस्था टिकत नाहीत. साम्यवाद, गांधीवाद किंवा हिंदुत्ववाद या विचारसरणींच्या मुळाशी शेवटी अर्थविषयक प्रगल्भता महत्त्वाची आहे. नवनवीन उद्योगांसाठी कल्पनांची झेप आवश्यक असून एखाद्या लहान खेडय़ातील तरुणालाही ती घेता येईल, असे ते म्हणाले.
गडकरी म्हणाले, गडचिरोली आणि इतर भागातील ५१६ शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यासाठी नागपुरात स्टुडिओ उभारण्यात येईल. त्यासाठी मुंबईचे उद्योजक राजू मोहिले यांचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. याशिवाय वसतिगृहाचीही संकल्पना असून येत्या १ ऑक्टोबरला आर्वी येथे आणि त्यानंतर गडचिरोली येथे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. ५ हजार कोटींची कामे गडचिरोली भागात करीत आहे. लवकरच १० हजार लोकांच्या हातांना काम मिळेल.
प्रीती झिंटा म्हणाल्या, महिलांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. लहानपणापासूनच मुलींवर चांगले संस्कार व्हायला हवेत. चांगल्या संस्काराची रुजवात शाळांमधून होते. आईवडिलानंतर डॉक्टर किंवा शिक्षक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रास्ताविक अरुण लाखाणी यांनी केले. गजानन सिडाम यांनी एकलव्य एकल विद्यालयाची माहिती दिली. ‘आदर्श पर्यवेक्षक’, ‘आदर्श शिक्षक’ अशा पुरस्काराने यावेळी शिवदास भारसागडे, उषा ब्राम्हणकर, गणेश चाफले, राजेश मडावी आणि राजेश उईके आदींना पुष्पगुच्छ, रोख रक्कम देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
‘आता माझी सटकली’
प्रीती झिंटा यांना मराठी भाषा समजत नसल्याने मध्येमध्ये गडकरी दुभाषकाचे काम करीत होते. संचालनकर्तेही मराठी-हिंदीचा उपयोग करीत होते. भाषणात प्रीती म्हणाल्या, हिंदीतून बोलले कारण मराठीतून एकच वाक्य माहिती आहे ‘आता माझी सटकली’. पण ते यावेळी बोलणार नाही. त्यानंतर भाषणासाठी आलेल्या कुबेर यांनी सरळ सांगितले की, मराठीतून बोललो नाही, तर श्रोते म्हणतील, ‘आता माझी सटकली’. त्यामुळे सभागृहात खसखस पिकली.