नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस येणार असल्याची माहिती मिळत आहे. यानिमित्ताने आता राज्यपालांच्या वादग्रस्त विधानांची चर्चा सुरू झाली आहे. नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन प्रकरणामध्ये भगतसिंग कोश्यारी यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे मोठा वाद झाला होता.
असे आहे प्रकरण
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अपात्र व्यक्तीची नियुक्ती केल्याचा दावा करत माजी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी थेट राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि डॉ. प्रशांत कडू यांना प्रतिवादी केले आहे. तर मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावली आहे.