नागपूर : कॉंग्रेस नेते व देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांना केंद्र सरकारने भारत रत्न पुरस्कार जाहीर केला. राव हे दोनदा नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणून गेल्याने त्यांचा या जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राशी निकटचा संबंध होता. रामटेकमध्ये साकारलेले कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ ही त्यांची संकल्पना होती. याच भावनेतून कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंगराव यांचा पुतळा उभारण्यात आला.

२०२२ मध्ये या पुतळ्याच्या अनावरण तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टाळल्यामुळे वाद झाला होता. यावेळी झाकलेल्या नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाजूने कोश्यारी निघून गेले होते. मात्र अपरिहार्य कारणाने या पुतळ्याच्या अनावरण होऊ शकले नाही. त्यामुळे घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनी अनेक विवादांना जन्म दिला होता. त्यानंतर आता या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त निघाला आहे. बुधवार १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशीष जयस्वाल आदींची उपस्थिती रराहणार आहे. नरसिंहराव यांचा मुलगा प्रभाकरराव यांनी हा पूर्णाकृती पुतळा विश्वविद्यालयाला भेट दिला आहे.

संस्कृत विद्यापीठाच्या स्थापनेत काँग्रेसचा पुढकार

नरसिंह राव मुळचे आंध्र प्रदेशचे असले तरी ते लोकसभा निवडणूक नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून लढत. नरसिंह राव यांची अनेक भाषा जाणणारे विद्वान अशी ओळख होती. नागपूरचे तत्कालीन युवा व उच्च विद्याविभूषित नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याशी त्यांच्या जिव्हाळ्याचे संबंध होते. राव आणि श्रीकांत जिचकार यांच्या चर्चेत महान कवी कालिदास यांच्या स्मरणार्थ एखादे संस्कृत विद्यापीठ उभे करायची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात तोपर्यंत संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष विद्यापीठ नव्हते. जिचकार यांनी पंतप्रधानांना सांगितले की, हे विद्यापीठ महाराष्ट्रात तेही रामटेक येथेच उभारावे, कारण संस्कृत साहित्यातील अनमोल ठेवा मानले जाणारे मेघदूत हे महाकाव्य कवी कालिदासाने रामटेक तेथेच लिहिले.

नरसिंहराव यांना ही कल्पना प्रचंड आवडली. शिवाय रामटेक हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता. तिथल्या मातीचे पांग फेडण्यासाठी काही तरी करायची त्यांची इच्छा होती. त्यांनी जिचकार यांना या विद्यापीठासाठी प्रयत्न करावेत असे आदेश दिले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक. डॉ. श्रीकांत जिचकार त्यांच्याकडे विद्यापीठाची मागणी करण्यासाठी गेले. पंतप्रधानांचा सातत्याचा आग्रह यामुळे मुख्यमंत्र्यानी डॉ. श्रीकांत जिचकार यांची एक सदस्यीय समिती गठीत केली. डॉ. जिचकार यांनी भारतातील सर्व विद्यापीठांचे अध्ययन करून शासनाला एक विस्तृत अहवाल सादर केला होता.