अमरावती : प्रत्येक भाषेचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे चुकीचे नाही. पण, त्यामुळे आपण इतर भाषांचा द्वेष करतो, असा गैरसमज निर्माण केला जातो. संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी आणि देशातील इतर भाषांमधील साहित्याचा मातृभाषांमध्ये अनुवाद व्हायला हवा. कुठल्याही भाषेचा द्वेष करण्याची गरज नाही. इंग्रजी म्हणजे संपूर्ण ज्ञान नव्हे, तर ती केवळ एक भाषा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ४१ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, माझ्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हा माझ्यासाठी सन्मानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. तामिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी बराच मोठा संघर्ष करावा लागला.

अखेर दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हा आमच्यासाठी सर्वोच्‍च आनंदाचा क्षण होता. त्या तुलनेत मराठीला सहजरीत्या हा दर्जा मिळाला. राज्यपाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिकृत कामासाठी मराठीचा वापर केला, ज्यामुळे तिला राजेशाही दर्जा मिळाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मराठी भाषेत विपुल लेखन आणि उपदेश केले.

इतर भाषांसोबतच आपण मराठी या अभिजात भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास आणि जतन केले पाहिजे. संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी आणि भारतातील इतर अभिजात भाषांमध्ये साठवलेले ज्ञान मराठीत भाषांतरित केले पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल.

राज्यपाल म्हणाले, विद्यापीठात पारंपारिक अभ्यासक्रमांसोबतच, आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स यांसारख्या प्रगत क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार केले पाहिजेत, जे उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम बनवता कामा नये, तर त्यांच्यात कामाप्रती आणि जीवनाप्रती योग्य दृष्टिकोनही आणला पाहिजे. तरच वाढलेल्या सामाजिक आनंदाने राष्ट्राचा विकास साधता येईल. आपण परदेशी विद्यापीठांशी भागीदारी करून विद्यार्थ्यांसाठी बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Story img Loader