यवतमाळ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा सध्या राज्यात संवाद दौरा सुरू आहे. विविध जिल्ह्यात भेटी देवून जिल्ह्यातील जाणकार लोकांशी संवाद साधून ते समस्या जाणून घेत आहेत. मात्र, राज्यपालांच्या या दौऱ्यात मर्जीतील लोकांनाच संवादाची संधी मिळत असल्याने अनेक जिल्ह्यांत रोष व्यक्त होत आहे. हाच प्रकार आज शनिवारी यवतमाळातही बघायला मिळाला. राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज शनिवारी दुपारी यवतमाळ येथील विश्रामगृहात केवळ ३८ मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला. संवादावेळी सत्ताधारी नेते आणि अधिकाऱ्यांचीच संख्या अधिक होती. राज्यापालांशी संवादासाठी मोजक्याच लोकांना संधी मिळाल्याने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाबद्दल रोष व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> धक्कादायक! भाजपा नेत्या नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी; हैदराबादवरून आलं निनावी पत्र

जिल्ह्यात कृषी क्षेत्राशी निगडीत समस्या सर्वाधिक आहेत. मात्र, या क्षेत्रातील केवळ तिघांना राज्यपालांसमोर संवादाची संधी देण्यात आली. मोजक्याच पत्रकारांना राज्यपालांशी संवादाची संधी मिळाल्याने, पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकार संघटनेने दिलेल्या नावांनाच राज्यपालांशी संवाद साधण्यसाठी बोलावल्याचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यपालांच्या संवादासाठी सर्व माध्यम प्रतिनिधींना बोलावले जाणे आवश्यक असताना मोजक्याच लोकांना का बोलावले, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हेही वाचा >>> नागपुरातील सर्वात उंच इमारतीबाबत अखेर न्यायालयाचा निर्णय आला, आता ही इमारत…

जिल्ह्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याने शेकडो महिला दररोज पहाटेपासून बँकेसमोर रांग लावत आहे. तरीही अनेकांचे केवायसी पूर्ण झालेले नाही. कामगारांना साहित्य वाटपात सर्वत्र गोंधळ सुरू आहे. कामगार लोकं २४ तास या साहित्याची वाट पाहत ताटकळत असतात. नेर येथे गुरूवारी कामगारांचे साहित्य घेवून आलेले दोन ट्रक गर्दी व गोंधळ पाहून साहित्य वाटप न करताच निघून गेले. शेतकरी अनुदाच्या प्रतिक्षेत बॅकेंच चकरा मारत असल्याचे चित्र असताना राज्यपालांसमोर मात्र केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची कशी काटेकोर अंमलबजावणी सुरू असून, लाभार्थ्यांना कसा लाभ मिळाला, याचे चित्र दाखविण्यात आल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. विविध क्षेत्रातील माहिती जाणून घेतल्यानंतर नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजना उत्तमपणे राबविल्या गेल्या पाहिजे, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. राज्यपाल यवतमाळ येथे पोहोचताच पालकमंत्री संजय राठोड यांनी विश्रामगृहावर त्यांचे स्वागत केले. यावेळी यवतमाळचे आमदार मदन येरावार, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. विश्रामगृहावर पोलिसांनी राज्यपालांना मानवंदना दिली. राज्यपालांच्या दौऱ्यावेळी विश्राम भवन मार्गावरील वाहतूक अडविण्यात आल्याने शहरातील वाहनधारकांची गैरसोय झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor radhakrishnan interacted with only 38 dignitaries at yavatmal rest house nrp78 zws